

पुणे, ता. १ : उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या नावाखाली स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थे’चा (एमएसएफडीए) कारभार केवळ काही ठराविक शहरांपुरताच सीमित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या सहा वर्षांत संस्थेने प्रशिक्षित केलेल्या १९ हजार ९२२ प्राध्यापकांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि सोलापूर या शहरी भागातील प्राध्यापकांची संख्या लक्षणीय आहे. उर्वरित ग्रामीण आणि निमशहरी भागांतील प्राध्यापक अद्यापही प्रशिक्षणापासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमधील जवळपास ३५ टक्के प्राध्यापक अद्याप संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणापासून वंचित आहेत.
राज्यातील प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) स्थापन करण्यात आली. प्राध्यापक प्रशिक्षणातून शैक्षणिक क्षमता बांधणी, गुणवत्ता हमी आणि ज्ञान देवाणघेवाण यासाठी स्वतंत्र अकादमी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. संस्थेला वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी, याप्रमाणे आतापर्यंत १२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात सरकारी, अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण ३१ हजार प्राध्यापक कार्यरत आहेत. संस्थेने आतापर्यंत १९ हजार ९२२ प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले असून, अद्यापही ११ हजारांहून अधिक प्राध्यापक प्रशिक्षणापासून वंचित आहेत. अर्थात, हे प्रशिक्षण अनिवार्य नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
सुरवातीच्या टप्प्यात ८० ते ९० टक्के तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापक प्रशिक्षणासाठी येत होते. संस्थेमार्फत आयोजित पाच दिवसांचे अध्यापक विकास कार्यक्रम आणि २८ दिवसांचे प्राध्यापक प्रबोधन कार्यक्रम हे विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या निकषांनुसार ‘कॅस’ (करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत पदोन्नतीसाठी समकक्ष म्हणून ग्राह्य धरले जातात. तसेच, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या २४ डिसेंबर २०२१च्या अध्यादेशानुसार या प्रशिक्षणानंतर मिळणारे प्रमाणपत्र शिक्षक आणि शिक्षकेतर संवर्गाच्या पदोन्नतीसाठी अधिकृतपणे वैध आहे. त्यामुळे संस्थेतील विविध प्रशिक्षणात्मक उपक्रमांची माहिती मिळाल्यानंतर कायमस्वरूपी प्राध्यापकही प्रशिक्षणात सहभागी होत आहेत, असे उच्च शिक्षण संचालक आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे (एमएसएफडीए) कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी अधोरेखित केले.
..............
*आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या प्राध्यापकांची आकडेवारी :*
वर्ष : प्राध्यापकांची संख्या
२०२१-२२ : ९७५
२०२२-२३ : ३,६७३
२०२३-२४ : ४,४९८
२०२४-२५ : ३,९७८
२०२५-२६ : ५,४३६
२०२६-२७ : १,३६२ (आत्तापर्यंत)
.............
*जिल्हानिहाय प्रशिक्षण घेतलेले प्राध्यापक :*
जिल्हा : प्राध्यापकांची संख्या
पुणे : २,५०६
मुंबई : १,८४३
नाशिक : १,२५४
नागपूर : १,०७१
सोलापूर : १,०६४
अमरावती : ७२३
सांगली : ७२३
लातूर : ६९०
............
‘‘महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेमार्फत एकूण ३५ हजार प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. आतापर्यंत २० हजार प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे. येत्या वर्षात १२ हजार प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.’’
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.