भोसरी : महेश लांडगे आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीअखेर 4387 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे हे पिछाडीवर आहेत.

पिंपरी (पुणे) : भोसरीत विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीअखेर 4387 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे हे पिछाडीवर आहेत. वंचित विकास आघाडीचे उमेदवार शाहनवाज शेख यांना 241 मते मिळाली.  

अपक्ष परंपरा खंडित होणार? 

मतदारसंघ अस्तित्वात येऊन दहा वर्षे झाली. या कालावधीत दोन विधानसभा निवडणूक झाल्या. त्यात अपक्षांनीच बाजी मारली. पहिल्यांदा विलास लांडे व नंतर महेश लांडगे आमदार झाले. आता दोघेही प्रतिस्पर्धी आहेत. 

- 2009 : मतदारसंघाचे प्रथम आमदार होण्याचा मान विलास लांडे यांना मिळाला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सुलभा उबाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंगला कदम होत्या. केवळ 1200 मतांनी लांडे विजयी झाले होते. 

- 2014 : लांडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली व विजयी झाले. लांडे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दुसऱ्या स्थानावर शिवसेनेच्या उबाळे राहिल्या. भाजपचे एकनाथ पवार चौथ्या क्रमांकावर होते. लांडगे यांना 60 हजार 173 मते मिळाली होती. 

- 2019 : चार वर्षांपूर्वी लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी लांडे आहेत. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. मात्र, 2014 मध्ये चौथ्या क्रमांकावर असलेले पवार आता लांडगे यांच्यासोबत आहेत. शिवाय मतदारसंघातील 43 पैकी 34 नगरसेवक लांडगे यांचे समर्थक आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pune Bhosari