Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भाजपचा कार्यकर्ता म्हणूनच काम करायला शिकलो. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्यानेच मी कोथरूडमधून निवडणूक लढवीत आहे. मी लढत नाही; पण लढलो तर हरत नाही.
- चंद्रकांत पाटील, भाजप उमेदवार, कोथरूड

विधानसभा 2019 : पुणे - आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी, मुरलीधर मोहोळ समर्थकांतील रुसवे-फुगवे, ‘सोशल मीडिया’वरील चर्चा, काही तासांतच ‘दादां’ना प्रचंड मताधिक्‍याने विजयी करण्याचा कुलकर्णी यांचा शब्द, मेळाव्यासाठी मोहोळ यांनी घेतलेला पुढाकार... या साऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर कोथरूड मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. 

पुण्याच्या प्रश्‍नांची आधीपासूनच जाण आहे. ते टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्‍वासन देतानाच पाटील यांनी नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता दोनच दिवसांचा अवधी राहिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः कोथरूड मतदारसंघातील राजकीय चित्र काय असेल, याकडे लक्ष लागले असले; तरी सर्वाधिक चर्चाही पालकमंत्री पाटील यांच्या उमेदवारीचीच सुरू आहे. ‘तिकीट कापल्यानंतर अन्य राजकीय पक्षांकडून उमेदवारीची ‘ऑफर’ 

असल्याचे सांगत, भाजपच्या एकाही नेत्याचा फोन आला नाही, असे गाऱ्हाणे मांडत आमदार कुलकर्णी यांनी आपली नाराजी उघड केली. त्यानंतर भाजपच्या मेळाव्याला मोहोळ समर्थक उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. या पार्श्‍वभूमीवर उत्सुकता निर्माण केलेल्या पक्षाच्या मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. ‘चंद्रकांतदादा तुम आगे बढो,’ अशी घोषणा देत आमदार कुलकर्णी यांनीच मेळाव्यात जाण आणली.

या मेळाव्याला महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार, योगेश गोगावले आदी उपस्थित होते. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस बाबा जाधवराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

पाटील म्हणाले, ‘‘माझ्या उमेदवारीमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली. मात्र, पक्षाचा आदेश असून, तो पाळण्याचे काम कार्यकर्त्यांचे आहे. त्यातून निवडणूक लढविण्याचा पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य केला. त्यानंतर नाराजीचा सूर आळवला गेला. पण, या मेळाव्यानंतर ते चित्र नसेल. पुण्याशी जवळीक असल्याने स्थानिक समस्यांची जाणीव आहे. त्या सोडविण्यात येतील.’’

संघटनेवर माझी निष्ठा आहे. मात्र, थोडे दु:ख होऊ शकते. त्यातून भावना पुढे येतात. कोथरूडमध्ये जिव्हाळा जपला आहे. त्याच्या बळावर पाटील यांना प्रचंड मताधिक्‍य मिळवून देईन.
- मेधा कुलकर्णी, विद्यमान आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 Kothrud Chandrakant Patil Promotion Politics