Vidhan Sabha 2019 : आज ठरणार लढती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शनिवारी (ता. ५) अर्ज छाननीत महत्त्वाच्या पक्षांतील अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले. सोमवारी (ता. ७) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. नंतर शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरीसह लगतच्या मावळ मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. 

विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शनिवारी (ता. ५) अर्ज छाननीत महत्त्वाच्या पक्षांतील अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले. सोमवारी (ता. ७) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. नंतर शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरीसह लगतच्या मावळ मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. 

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किसन कांबळे यांच्या ‘एबी फॉर्म’वर नावच नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला.

चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांच्याही अर्जासोबत एबी फॉर्म नव्हता, त्यांच्यासह भोसरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दत्ता साने यांचाही अर्ज बाद झाला आहे. शिवाय भोसरीतून राष्ट्रवादीने उमेदवार पुरस्कृत केला आहे. त्यामुळे चिंचवड व भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचा थेट उमेदवार नसेल. पर्यायाने चिन्हही नसेल.

पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार अण्णा बनसोडे व नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना एबी फॉर्म दिला होता. धर यांचा अर्ज बाद झाला. मात्र, त्यांनी अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. त्यांनी माघार न घेतल्यास त्या निवडणूक रिंगणात असतील. मनसेचा उमेदवार छाननीतच बाहेर पडल्याने रंगत कमी झाली आहे. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यांनी विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात मित्रपक्ष आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे अमित गोरखे यांनीही बंडखोरी केली आहे. त्यांनी माघार न घेतल्यास बहुरंगी लढत असेल.

चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना महाआघाडीची उमेदवारी मिळाली होती. मात्र, पक्षाने दिलेला एबी फॉर्म त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरला. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा देत, ‘पक्षाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे माझ्यावर अन्याय झाला’ अशी भावना व्यक्त केली. त्यांची पुढील भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत करणार असल्याची चर्चा आहे. येथून भाजपचे शहराध्यक्ष विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप महायुतीचे उमेदवार आहेत. वंचित येथून आपली ताकद अजमावत आहे.

भोसरी 
महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार महेश लांडगे रिंगणार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते बंडखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र, गेल्या वेळच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी लांडगे यांची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादीने थेट उमेदवार उभा न करता माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले नगरसेवक दत्ता साने यांचा अर्ज बाद झाल्याने तीन किंवा चौरंगी लढतीची शक्‍यता मावळली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला आहे. अन्य छोट्या छोट्या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Politics Pimpri Chinchwad Bhosari Fight