Vidhan Sabha 2019 : ...तर त्यांची हिंमत झाली नसती - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते; त्याचे काय झाले ?
  • वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी तीन-चार हजार कोटी रुपयांचा खर्च
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी एक लाख दहा हजार कोटींचे कर्ज कशासाठी? 
  • स्मारके उभारण्याऐवजी गड-किल्ल्यांचे संवर्धन करा तरच पुढच्या पिढीला मराठा साम्राज्याचा इतिहास कळेल
  • पीएमसी बॅंकेवर भाजपचे आणि सिटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर शिवसेनेचे नेते
  • रिझर्व्ह बॅंक सहकारी बॅंका काढण्यासाठी परवाना देते, मग पैसे बुडाल्यानंतर जबाबदारी कोणाची?
  • पावसामुळे स्मार्ट सिटीमधील घरा-घरांत पाणी, नक्‍की काय चाललंय?
  • नोटबंदी आणि जीएसटीमुळे देश पिछाडीवर

विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी माझ्याबाबतही ‘तशी’ हिंमत झाली नसती, असे सांगत त्यांनी आपल्या ‘ईडी’ चौकशीचाही अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. 

मनसेचे कसब्यातील उमेदवार अजय शिंदे, कोथरुडमधील किशोर शिंदे, शिवाजीनगरमधील सुहास निम्हण आणि पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील मनीषा सरोदे यांच्या प्रचारार्थ मंडई येथे आज सायंकाळी राज यांची सभा पार पडली. त्यांनी या वेळी आपल्या शैलीत भाजप-शिवसेना सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. 

शेती, उद्योग आणि रोजगारांवरून केंद्र सरकारवरही तोफ डागली. ३७० कलम रद्द केले त्याबद्दल अमित शहा यांचे अभिनंदन. परंतु उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या प्रश्‍नांबद्दल कधी बोलणार? असा सवाल त्यांनी केला.  राज म्हणाले, ‘‘मला सरकारला धारेवर धरण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष उभा करायचा आहे. विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती दिल्यास सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणू. त्यांच्या कामाची चिरफाड करू.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 raj thackeray politics