#कारणराजकारण : युती, मनसेचे होणार काय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

आघाडीचा मेळावा
काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघासाठी दोन नेत्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या माध्यमातून प्रचारयंत्रणा राबविली जाणार आहे; तसेच नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. संपूर्ण शहराचा एक आणि प्रत्येक मतदारसंघाचा स्वतंत्र असा जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू आहे. ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेसशी आघाडी होणार, हे गृहीत धरून प्रचाराची तयारी सुरू केली आहे. प्रथम मतदरासंघनिहाय नंतर प्रभागनिहाय मेळावे घेतले जाणार आहेत. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक व कार्यकर्त्यांचा संयुक्त शहरव्यापी मेळावा होणार आहे; तसेच प्रत्येक ४२ प्रभागप्रमुखांकडे १५ याद्या; तर निरीक्षकांकडे ३० याद्या दिल्या आहेत. घरोघरी संपर्क साधण्यावर भर देणार आहे.

विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. पुण्यात भाजपसोबत युती होणार की नाही, हे कळत नसल्याने शिवसेनेकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच अडकणार की निवडणुकीत उतरणार, हेच निश्‍चित नसल्याने कार्यकर्ते गोंधळात आहेत. एकंदरीत दोन्ही काँग्रेस एकमेकांच्या मदतीने; तर सत्ताधारी भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्‍चित आहे. ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेससाठी कसबा, कॅंटोन्मेंट व शिवाजीनगर हे मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली. भाजपचे आठ विद्यमान आमदार असल्याने या सर्वच मतदारसंघांवर दावा केला आहे. युती झाली तर जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला एखाद दुसरा मतदरासंघ येण्याची शक्‍यता आहे; परंतु युती झालीच नाही, तर आठही विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीसाठी तयार राहा, असा आदेश ‘मातोश्री’तून दिला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी तर कसब्यातून प्रचारालाही सुरवातही केली आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतरच इलेक्‍शन मोडवर असलेल्या भाजपने बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांना कामाला लावले आहेच. प्रत्येक आमदार व इच्छुक उमेदवार तिकीट मिळणार, या विश्‍वासाने कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेत त्याची झलक बघायला मिळाली. पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यातून घरोघरी पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाचे नेते जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. 

‘सरकारनामा’ आणि www.esakal.com वरून ‘सकाळ’ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल?

आपली मते मांडा 
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१३००८८४५९
ई-मेल webeditor@esakal.com (ई-मेलचा subject: #कारणराजकारण)
फेसबुक’वर फॉलो करा fb.com/SakalNews
आपले मत ट्विट करा #कारणराजकारण हा हॅशटॅग वापरून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Yuti Aghadi Politics