६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
Published on

राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई तीव्र
--
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; ६३३ गावांना ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राज्यातील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्त्रोत कोरडे पडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांना एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मंगळवारी (ता. १९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून समोर आली.

राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कार्यरत असलेल्या टँकरमध्ये ३३ शासकीय तर ६७३ खासगी टँकरचा समावेश आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची व्याप्ती वाढत असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

ठाणे विभागात सर्वाधिक १७७ गावे आणि ५७२ वाड्यांना १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात १५६ गावे आणि ४४४ वाड्यांसाठी १५९ टँकर कार्यरत आहेत. पुणे विभागात १४५ गावे आणि ५७२ वाड्यांमध्ये १३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात १३८ गावे आणि ६४ वाड्यांसाठी तब्बल २४४ टँकर कार्यरत असून राज्यातील सर्वाधिक टँकर या विभागात वापरण्यात येत आहेत. अमरावती विभागात १७ गावांसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर विभागात अद्याप टँकरची आवश्यकता निर्माण झालेली नाही.

दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना नियमित आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर पुरवठ्यासह पर्यायी जलस्रोतांचा वापर, विहिरींचे अधिग्रहण आणि उपलब्ध जलसाठ्यांचे नियोजन यावर भर दिला जात आहे.

आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com