सकाळ भूमिका

सकाळ भूमिका
Published on

भूमिकन्यांसाठी पुढचे पाऊल


इंट्रो
महाराष्ट्र सरकार आता महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचा गांभीर्याने विचार करत असून त्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. यानिमित्ताने या परिवर्तनाची नोंद.
.................................................................................................
तिच्या श्रमाचे मोल
तो जेव्हा शिकारीला बाहेर पडला, तेव्हा ती एकटीच घरी थांबायची, लेकर-बाळं आणि घरदार सांभाळत हळूहळू तिने परसबाग फुलवाल्या. लाकूडफाटा गोळा करण्यासाठी ती जंगलामध्ये जायची तेव्हा घरी परतताना बिया अन् फळेदेखील सोबत आणायची. जंगल आकुंचन पावत गेले तसे जमिनीचे तुकडे उघडे पडले. या तुकड्यांवर हळूहळू तिने शेती करायला सुरुवात केली. साधारणपणे दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी तिने या जमिनीच्या कुशीत काही तरी पेरले अन् त्यातून पीक उगवले. कधी निसर्गाचा कोप, तर कधी प्रतिस्पर्धी टोळ्यांचे हल्ले यांचा समर्थपणे मुकाबला करत तिने शेती टिकवली आणि वाढवली. म्हणून ती सर्वांची आदिमाता, जगत् जननी ठरली... अनेक सणवार आणि धार्मिक उत्सव यांचा जन्मच मुळी शेतीत झाला. शेती ही महिलेची कर्तबगारी होती; पण त्याचे श्रेय मात्र पुरुषाने घेतले. अवजड, जोखमीची कामे तो करायचा; पण पेरणी, मळणी आणि कापणीला तिचा हातभार लागायचा. जगाला धन्याने मातीत गाळलेला घाम दिसला; पण तिच्या श्रमाचे मूल्य मात्र कोणाच्या लक्षात आले नाही. तिला गृहीत धरण्यात आले. परिणामी तिचे शेतात राबणेदेखील गौण ठरले. सातबाऱ्यापासून ते मालाच्या खरेदी-विक्री पावतीपर्यंत सगळीकडे त्याने आपले नाव मिरवले; पण तिच्या श्रमाचे मूल्य जाणले गेले नाही. आता काळ बदलू पाहतोय. महाराष्ट्र सरकार आता महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचा गांभीर्याने विचार करत असून त्यासाठी वेगळे विधेयकच विधिमंडळाच्या पटलावर मांडण्यात येईल. राज्य सरकारचे हे पाऊल स्वागतार्हच म्हणावे लागेल, किमान उशिरा का होईना तिला न्याय मिळावा या उद्देशाने सरकारची पावले पडू लागली आहेत. या कायद्यामुळे शेतजमिनीवर तिचे नाव लागेल एवढेच नव्हे तर सरकारला कल्याणकारी धोरण आखण्यासही त्याची मदत होईल. मुख्य म्हणजे तिला तिच्या घामाच्या कमाईवर हक्क सांगता येईल. पुरोगामी महाराष्ट्राचे हे पाऊल जितके स्तुत्य तितकेच अनुकरणीयही ठरते.
........
कोट
मागील अनेक दिवसांपासून आम्ही महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडत होतो. आता महाराष्ट्र सरकार यासाठी वेगळे विधेयक आणत असेल तर त्याचे मी स्वागतच करेन. डॉ. सौम्या स्वामिनाथन काय सांगू पाहताहेत, हे अखेर राज्य सरकारने ऐकले आहे. त्यांचे वडील डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी खासदार असताना महिला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक भरपाईच्या अनुषंगाने वेगळे विधेयक सादर केले होते. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा मी अद्याप अ,भ्यासलेला नाही त्यामुळे त्यावर मी आताच काही बोलणार नाही. पण यामुळे महिला शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही आर्थिक बदल घडत असेल तर त्याचे स्वागत करू यात. मान्यतेचा मुद्दा हा केवळ महिलांपुरता मर्यादित नाही, दलित, आदिवासी, भूमिहीन शेतकऱ्यांचे काय? या प्रस्तावित विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेमका काय आर्थिक बदल होणार आहे? याचाही गांभीर्याने विचार करावा लागेल.
- पी. साईनाथ, मॅगसेसे पुरस्कारविजेते ज्येष्ठ पत्रकार
........................................................

शेतमजूर महिलांच्या प्रश्नांनाही यानिमित्ताने वाचा फोडण्याचे काम व्हावे, असी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या
नेमक्या समस्या
# जमिनीच्या मालकीत वाटा नाही
# पुरुष मजुरांच्या तुलनेत मजुरी कमी
# एकटी असताना शेतात किंवा कामावरून येताना जाताना अत्याचाराची बळी पडते
# कामाच्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधांचा अभाव
# शेतकाम करताना अनेकदा ती कुपोषित असते
# कौटुंबिक जबाबदारी घरात सर्वांत जास्त काम करते
# अनेकदा मजुरी करीत घरगुती हिंसाचारालाही सामोरे जाते
# आयुष्यभर मजुरी केल्याने वृद्धापकाळात व्याधीग्रस्त असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com