फुले दाम्पत्याच्या विचारांचा वारसा माळीनगरच्या मातीत

फुले दाम्पत्याच्या विचारांचा वारसा माळीनगरच्या मातीत
Published on: 

MLG26B03543
माळीनगर (ता. माळशिरस) : ‘महात्मा फुले अनुभवताना’ या विषयावर मुक्त संवाद साधताना डॉ. अमोल कोल्हे.

फुले दाम्पत्याच्या विचारांचा वारसा माळीनगरच्या मातीत
खासदार डॉ. अमोल कोल्हे; ‘महात्मा फुले अनुभवताना’ विशेष कार्यक्रम

माळीनगर, ता. २ : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निधनानंतर सुमारे ५० वर्षांनी त्यांच्या विचारांच्या पाऊलखुणा माळीनगरमध्ये औद्योगिक क्रांतीच्या रूपाने उमटल्या, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
माळीनगर साखर कारखान्याच्या गोल्डन ज्युबिली हॉलमध्ये रविवारी (ता. १) माळी शुगर, महात्मा फुले पतसंस्था, शुगरकेन सोसायटी व सासवड माळी एज्युकेशन सोसायटी यांच्या सौजन्याने आयोजित ‘महात्मा फुले अनुभवताना’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन मोहन लांडे, व्यवस्थापकीय संचालक गणेश इनामके, पूर्णवेळ संचालक निखिल कुदळे, राजेंद्र गिरमे, डॉ. अविनाश जाधव, रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे, अमोल ताम्हाणे, मनीष रासकर, कपिल भोंगळे उपस्थित होते. कलाशिक्षिका रजनी चौरे यांनी डॉ. कोल्हे यांचे स्वतः रेखाटलेले व्यक्तिचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
डॉ. कोल्हे म्हणाले, महात्मा फुले व सावित्रीबाईंचे कार्य केवळ मुलींची शाळा सुरू करण्यापुरते मर्यादित नसून ते व्यापक सामाजिक परिवर्तनाचे होते. हातात पाटी-पेन्सिल घेतलेल्या मुलींनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना नमन करावे, असे संस्कार शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर करावेत. राजमाता जिजाऊंनी पुण्यात स्वराज्याचा विचार रुजविल्यानंतर दोनशे वर्षांनी १८४८ मध्ये सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी घराबाहेर पडून परिवर्तनाची नवी वाट निर्माण केली. महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जोडणारा सेतू आहेत. या महापुरुषांचा समतावादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. फुले दाम्पत्याच्या कार्याचा जागर करणारी ‘सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका १६ नोव्हेंबरपासून सह्याद्री वाहिनीवर, तर नोव्हेंबरच्या अखेरीस हिंदीत डीडी नॅशनलवर प्रसारित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विवेक देशमाने यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.