कटगुण येथे महात्मा फुलेंचे स्मारक उभे रहाणार; ना. जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांना यश ; ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद

कटगुण येथे महात्मा फुलेंचे स्मारक उभे रहाणार; ना. जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांना यश ; ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद

Published on

कटगुणमध्ये उभारणार महात्मा फुलेंचे स्मारक

जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांना यश; अर्थसंकल्पात मंजुरी, ग्रामस्थांत आनंद

पुसेगाव, ता. ६ : समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक खटाव तालुक्यातील कटगुण येथे उभारण्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना महात्मा फुलेंच्या स्मारक उभारणीची घोषणा करताच कटगुणकर ग्रामस्थ आणि समस्त फुलेप्रेमींनी आनंद व्यक्त केला.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूळ गावी कटगुण येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी अनेक वर्षे केली जात होती. मंत्री गोरे यांच्याकडे कटगुण ग्रामस्थांनी समारकाबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मंत्री गोरेंच्या प्रयत्नातून नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे. या स्मारकासाठी १४२ कोटींची मोठी तरतूद होऊन प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. त्याचवेळी कटगुण येथील स्मारकासाठीही निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कटगुण येथे फुलेंचे स्मारक उभारण्याची घोषणा करताच कटगुण ग्रामस्थ आणि समस्त फुले प्रेमींनी आनंद व्यक्त केला.
मंत्री गोरे म्हणाले, ‘‘महात्मा फुलेंनी स्त्रीशिक्षण, सामाजिक समानता आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांना भारतीय समाजसुधारणेचे महान जनक मानले जाते. त्यांचे कार्य प्रत्येक पिढीला मार्गदर्शक आहे. आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे विचार प्रेरणादायी ठरणार आहेत, त्यासाठी कटगुण येथे त्यांचे भव्य स्मारक उभारणे क्रमप्राप्त होते.’’
अनेकांनी येथील स्मारकासाठी शब्द दिले. मात्र, प्रत्यक्षात काम झाले नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलेंच्या स्मारकाला मंजुरी दिली आहे. कटगुण येथे स्मारकासाठी आवश्यक असणारी गायरान जमीन उपलब्ध नाही. शासकीय जागा असेल, तर ठिक अन्यथा आम्ही नायगावप्रमाणे स्मारकासाठी जागा खरेदी करून कटगुण येथील स्मारक उभारणार आहोत. लवकरच त्यासाठीचा आराखडा तयार केला जाणार आहे. स्मारकासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करणार आहे. फुलेंच्या २०० व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले.

-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com