Pune : महाविकास आघाडी सरकारने प्रेतयात्रा काढून शेतकरी धोरणाचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

महाविकास आघाडी सरकारने प्रेतयात्रा काढून शेतकरी धोरणाचा निषेध

पुणे : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. अतिवृष्टी, वादळाचा फटका बसूनही शेतकऱ्यांना पुरेशी मदत न देणारे हे सरकार शेतकरीद्रोही आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हे सरकार मृत झाले असून सरकारची प्रेतयात्रा काढून त्यांच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध आवाज उठविला जाईल, अशा शब्दात माजी मंत्री व भाजपचे आमदार संभाजी निलंगेकर पाटील यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. निलंगेकर पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी लातुर येथून आंदोलनाला सुरूवात केली. रविवारी पुण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

निलंगेकर पाटील म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीपुर्वीच्या अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. तेव्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना 50 हजार प्रतिहेक्‍टरी मदत देऊ, असे त्यांनी जाहीर केले. सत्तेवर आल्यानंतर 10 हजार रुपयेही हेक्‍टरी दिले नाहीत. याऊलट शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले, तर थकीत वीजबिलापोटी साडे सात हजार रुपये घेत, शेतकऱ्यांकडूनच पैसे काढून घेतले. ठाकरे सरकाने सुरूवातीला 11 हजार 500 कोटी, दुसऱ्यावेळी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली, प्रत्यक्षात तेवढी मदत शेतकऱ्यांना मिळालीच नाही.''

शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आल्यानंतर राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकते. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ते महाराष्ट्र बंद ठेवतात, परंतु इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे पाहण्यास या सरकारला वेळ नाही,'' असेही त्यांनी सांगितले.

निलंगेकर पाटील म्हणाले...

  1. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विमा कंपन्यांना हजारो कोटींचे नुकसान

  2. मागील वर्षी विमा कंपन्यांना 4 हजार कोटींचा नफा

  3. महाविकास आघाडी सरकार विमा कंपन्यांच्या दलालाप्रमाणे काम करते

  4. एसटी कामगारांवर पुर्वीपासूनच शोषण

  5. किमान वेतनाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

टॅग्स :Pune News