
महाराष्ट्रातील वीज उद्योगाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करण्यासाठी पाटस ते दौंड असा १८ किलोमीटर दुचाकी मोर्चा काढण्यात आला होता.
Mahavitaran March : महावितरण कर्मचार्यांचा १८ किलोमीटर मोर्चा
दौंड - महाराष्ट्रातील वीज उद्योगाच्या प्रस्तावित खासगीकरणाला विरोध करण्यासाठी पाटस ते दौंड असा १८ किलोमीटर दुचाकी मोर्चा काढण्यात आला होता. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमधील हजारो जागा रिक्त ठेवून कंत्राटी कामगार नेमून काम करून घेण्याच्या धोरणाला मोर्चाद्वारे या वेळी विरोध करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या पुढाकाराने पाटस (ता. दौंड) ते दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दरम्यान दुचाकी मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) केडगाव विभागातील अधिकारी व कर्मचारी या मध्ये सहभागी झाले होते.
केंद्र शासनाचा सुधारित कायदा येण्यापूर्वी राज्यात कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणे, महापारेषण मध्ये खासगी भांडवलदारांना खुले करणे, महावितरणच्या भांडुप परिमंडळातील कार्यक्षेत्रात खासगी इलेक्ट्रिक कंपनीने वीज वितरणासाठी मागितलेल्या परवानगीस विरोध, महानिर्मिती कंपनीच्या अधिकारक्षेत्रातील जलविद्युत केंद्रांचे पुनर्निर्माण करण्याच्या नावाखाली खासगीकरण करण्याच्या धोरणाला मोर्चातील अधिकारी व कर्मचार्यांनी तीव्र विरोध केला.
दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, दौंड शहरचे सहायक अभियंता बशीर एच. देसाई , दौंड उपविभागाचे सहायक अभियंता वैभव पाटील, दौंड उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अमित धोत्रे, दौंड ग्रामीण विभागाचे सहायक अभियंता जीवन ठोंबरे, कुरकुंभ येथील लाइनमन राजेंद्र देहाडे, आदी या वेळी उपस्थित होते.