

PNE26W43944
सोलापूर : ‘महावॉकेथॉन’मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी.
‘महावॉकेथॉन’मध्ये ५ हजार नागरिकांचा सहभाग
‘पाणी आणि माती वाचवा, भविष्य सुरक्षित करा’चा संदेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : ‘माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आजची बचत... उद्याचे सुरक्षित भविष्य!’ हा संदेश देत सोलापुरातील जवळपास पाच हजार नागरिकांनी महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. होम मैदान, डफरीन चौक, सेंट जोसेफ विद्यालय, महात्मा गांधी पुतळा, भैय्या चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर प्रशाला, जिल्हा परिषद पूनम गेट, रंगभवन आणि पुन्हा होम मैदान या मार्गावर महावॉकेथॉन झाली.
जलसंधारण दिनानिमित्त जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा झाला. सप्ताहाचा समारोप आज सकाळी होम मैदान येथे ‘महावॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाने झाला. यासाठी तब्बल ५ हजार ११५ नागरिकांनी नोंदणी केली होती. प्रारंभी सर्व उपस्थितांनी जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात झाली. या महावॉकेथॉनमध्ये अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, योगाचार्य विठ्ठल जाधव, कार्यकारी अभियंता रामचंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सप्ताळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दयानंद महाविद्यालय, संगमेश्वर महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहरूनगर माध्यमिक प्रशाला, एन. के. ऑर्किड कॉलेज, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, स्नेह निकेतन कुमठे प्रशाला आदी शैक्षणिक संस्थांनी या पदयात्रेत सहभाग घेतला. महावॉकेथॉनमध्ये २ वर्षांचा सुदर्श वाघमारे आणि ६ वर्षांची अवनी घोडके या चिमुकल्यांनीही सहभाग घेतला. सहभागी झालेल्या प्रतीक पाकणीकर या युवकाची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली. त्यांना रोख ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व मेडल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन सुदर्शना नगारे यांनी केले.
कोट
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने सुरक्षित भविष्यासाठी पाणी आणि मातीचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी अडवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचे प्रदूषण कमी करणे अत्यावश्यक आहे. जमिनीची धूप व माती वाहून जाणे रोखण्यासाठी शेतांमध्ये तसेच डोंगर उतारांवर बांधबंधिस्ती करावी. जमिनीची धूप कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. आपण ज्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाचे आरोग्यही जपले पाहिजे.
- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.