पालकमंत्र्यांचा ताफा अडकताच सांगोला पोलिसांना जाग!

पालकमंत्र्यांचा ताफा अडकताच सांगोला पोलिसांना जाग!
Published on: 

PNE26W65735
महूद (ता. सांगोला) : महूद चाैकातील वाहतूक कोंडी.
---
पालकमंत्र्यांचा ताफा अडकताच पोलिसांना जाग!
महूद चौकातील अतिक्रमणांबाबत बीडीओंना पत्र; कारवाईकडे महूदकरांचे लक्ष
उमेश महाजन : सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. १४ : महूदच्या मुख्य चौकातील वाहतूक कोंडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वाहनांचा ताफा सोमवारी (ता. ९) तब्बल अर्धा ते पाऊण तास अडकल्यानंतर सांगोला पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. चौकातील अनधिकृत अतिक्रमणे आणि होर्डिंग हटविण्याबाबत पोलिसांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रत्यक्ष कारवाई होणार की केवळ पत्रव्यवहारावरच समाधान मानले जाणार, याकडे महूदकरांचे लक्ष लागले आहे.
जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर- मल्हारपेठ राज्य महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी महूदचा मुख्य चौक आहे. मात्र, दोन्ही मार्गांवरील वाहतुकीच्या तुलनेत चौकातील रस्ते अरुंद असल्याने येथे नेहमीच कोंडी होते. वारी, सण-उत्सवांच्या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
सोमवारी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कोंडीत पालकमंत्र्यांचा ताफाही अडकला. अखेर पोलिसांना वाहनांतून उतरून वाहतूक सुरळीत करावी लागली. विशेष म्हणजे, या चौकातील कोंडीमुळे यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत.
रस्त्यालगतची अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंग्स, रस्त्यावर थांबणारी वाहने आणि बेशिस्त वाहतूक यामुळे समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिक्रमणे व होर्डिंग्स तातडीने हटविण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांना केली असून, कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली आहे.
---
चौकट
दुर्घटनेवर चर्चा; उपाययोजनांचा अभाव
१३ मे २०२४ रोजी मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, तर ७५ हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्सचा प्रश्न ऐरणीवर आला. न्यायालयाने कडक नियमावली केली. महूदच्या ग्रामसभेतही याबाबत ठराव झाला. मात्र, प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झालेली नाही.
---
चौकट
मुळात महामार्गच अरुंद
जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर- मल्हारपेठ राज्य महामार्गाची रुंदी वाहतुकीच्या तुलनेत अपुरी आहे. त्यात अवजड वाहनांची वर्दळ, चौकातील अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक आणि वाहतूक पोलिसांचा अभाव यामुळे कोंडीत भर पडते. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्याबरोबरच महामार्गांची रुंदी आणि वाहतूक नियोजनाचाही विचार आवश्यक आहे.
---
चौकट
कागदी घोडे नाचणार की वाहतूक कोंडी सुटणार?
नोव्हेंबर २०२५ मध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चौकातील काही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र, मोहीम पुढे सुरू राहिली नाही. उलट, हटविलेली अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाली. त्यामुळे आधीची कारवाई दिखाऊ होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता तरी कायमस्वरूपी कारवाई होणार की पुन्हा कागदी घोडे नाचविले जाणार, याकडे महूदकरांचे लक्ष आहे.
---
कोट
सांगोला पोलिसांकडून गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेले पत्र महूद ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. हे पत्र प्रशासक व जबाबदार नागरिकांसमोर ठेवून सांगोला पोलिसांच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत गावाच्या हिताचा योग्य निर्णय घेतला जाईल.
- बाळासाहेब शिंदे, ग्रामविकास अधिकारी, महूद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.