

MHD26B05701
महूद : येथील वाहतूक कोंडीत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अडकलेल्या गाडीला वाट करून देताना पोलिस.
महूदच्या वाहतूक कोंडीत पालकमंत्रीही अडकले!
दोन महामार्गांच्या मुख्य चौकात वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा
महूद, ता. ९ : एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग अशा दोन महत्त्वाच्या मार्गांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महूदच्या मुख्य चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सण-उत्सव असोत अथवा पंढरपूरची वारी, महूदचा मुख्य चौक वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी अडथळाच बनला आहे. सोमवारी (ता. ९) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत चक्क पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही सुमारे अर्धा ते पाऊण तास अडकून पडावे लागले. अखेर त्यांच्याच ताफ्यातील पोलिसांनी रस्त्यावर उतरून अथक प्रयत्नांनी वाहनांना वाट करून दिल्यानंतर मंत्रिमहोदयांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.
जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्ग या दोन महत्त्वाच्या मार्गांवरील महूदच्या मुख्य चौकात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास तर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. महूदमधून पंढरपूर, अकलूज, आटपाडी आणि सांगोला या चारही दिशांना वाहनांच्या सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण मुख्य चौकच वाहनांनी गच्च भरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे हे आपल्या माण तालुक्यातील मूळ गावाकडून पंढरपूर तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी महूदमार्गे जात होते. साळमुख मार्गे महूदमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांची गाडी वाहनांच्या गर्दीत अडकली. बराच वेळ प्रतीक्षा करूनही वाहतूक सुरळीत होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील पोलिसांनी वाहनांतून खाली उतरून वाहतूक बाजूला करण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रयत्नांनंतर मंत्र्यांच्या वाहनाला मार्ग करून देण्यात आला.
कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करा
महूदच्या मुख्य चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, अद्याप येथे नियमित वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. चारही दिशांना किलोमीटरभर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसते. दुसरीकडे सांगोला आणि सोलापूर येथील वाहतूक पोलिस अधूनमधून महूदमध्ये येऊन वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा केवळ दंड आकारण्यावर भर दिला जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
चौकट
उड्डाणपूल किंवा बायपासची गरज!
पंढरपूरची वारी असो, सण-उत्सव असोत किंवा नियमित वाहतूक, महूदचा मुख्य चौक नेहमीच वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे मुख्य चौकात उड्डाणपूल उभारावा किंवा गावाबाहेरून बायपास रस्ता विकसित करावा, अशी मागणी महूदकरांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.