कळवणला मका खरेदीच्या आमिषाने फसवणूक

कळवणला मका खरेदीच्या आमिषाने फसवणूक
Published on: 

कळवणला मका खरेदीच्या
आमिषाने फसवणूक

शेतकऱ्यांना नऊ लाखांचा गंडा; अभोणा पोलिसांत गुन्हा दाखल

ॲग्रोवन वृत्तसेवा
कळवण/अभोणा, जि. नाशिक : शासकीय योजनेच्या माध्यमातून बियाणे, खते व कीटकनाशकांवर अनुदान मिळवून देण्यासह उत्पादित शेतीमालाला हमीभाव देऊन खरेदी करण्याचे आमिष दाखवत मका उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल ९ लाख ५६ हजार १०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार अभोणा परिसरात उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांकडून हजारो किलो मका खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. एवढेच नव्हे, तर पहिल्या हप्त्यापोटी दिलेला ९३ हजार ८०० रुपयांचा धनादेशही बँकेत वटला नाही.
या प्रकरणी वरखेडा येथील हिम्मत विष्णू पवार यांनी तक्रारीवरून ओ.एम.के. शेतकरी उद्योग समूहाचे अध्यक्ष सुनील बाबूराव कसाळे, कर्मचारी संगीता बोर्डे, किरण अर्णे, समाधान महाराज, अमोल चौधरी, श्याम वामन गावित, विदर्भ सीड कंपनीचे मॅनेजर स्वप्निल देशमुख, एरिया मॅनेजर सुजित झा आणि व्हिक्टोरिया मार्केल सीड्स इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक गुलाम जिलानी खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पवार यांच्या तक्रारीनुसार ओ.एम.के. शेतकरी उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी परिसरातील शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांवर अनुदान मिळवून देण्याबरोबरच उत्पादित मका हमीभावाने खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली. त्यानंतर शेतीमाल विक्रीसाठी संबंधित समूहाच्या प्रतिनिधींशी कंपनीने संपर्क साधला. दोन टप्प्यांत १८ टनांहून अधिक मक्याची खरेदी एप्रिल व मे २०२६ या कालावधीत विदर्भ सीड कंपनी आणि व्हिक्टोरिया मार्वेल सीड्स इंडिया प्रा.लि. यांच्या प्रतिनिधींमार्फत झाली. या मक्याची एकूण किंमत ९ लाख ५६ हजार १०० रुपये होती. शेतीमाल विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांची प्रतीक्षा सुरू झाली. सुरुवातीला पैसे लवकर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु वारंवार विचारणा करूनही संबंधितांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

कोट ----
मका खरेदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीनुसार नऊ जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. इतर शेतकऱ्यांचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा.
- योगिता कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक, अभोणा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.