#makepunesafe होर्डिंग दुर्घटनेची चौकशी बासनात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - मंगळवार पेठेतील होर्डिंग दुर्घटनेला दोन महिने होऊनही दोषींवर कारवाईच काय, पण साधी चौकशीही मध्य रेल्वेकडून गांभीर्याने केली जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सुटका झाली. मात्र, त्यांची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशीच गुंडाळली जात असल्याचे रेल्वेच्या कारभारावरून दिसून आले आहे. या घटनेत चार जणांचा जीव गेल्यानंतरही रेल्वेच्या पुणे विभागाची बेफिकिरी उघड होताच प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे थातूरमातूर उत्तर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिले. 

पुणे - मंगळवार पेठेतील होर्डिंग दुर्घटनेला दोन महिने होऊनही दोषींवर कारवाईच काय, पण साधी चौकशीही मध्य रेल्वेकडून गांभीर्याने केली जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सुटका झाली. मात्र, त्यांची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशीच गुंडाळली जात असल्याचे रेल्वेच्या कारभारावरून दिसून आले आहे. या घटनेत चार जणांचा जीव गेल्यानंतरही रेल्वेच्या पुणे विभागाची बेफिकिरी उघड होताच प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे थातूरमातूर उत्तर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

रेल्वेच्या मंगळवार पेठेतील जागेतील होर्डिंग पडल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले होते. रेल्वे खाते आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे उघड झाले होते. तेव्हा रेल्वेतील कनिष्ठ अभियंता संजय सिंग आणि पांडुरंग वनारे यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेचे गांभीर्य असल्याचा आव आणून रेल्वे प्रशासनाने चौकशीची घोषणा केली खरी. त्यासाठी मुंबईहून अधिकाऱ्यांचेही पथक आले. चौकशीच्या प्रक्रियेदरम्यान रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जामीनही मिळाला. त्यातील सिंग आणि वनारे हे तुरुंगातून बाहेर येऊन महिना लोटला तरी, चौकशी धीम्या गतीने सुरू असल्याची कबुली रेल्वेनेच दिली. यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा फायदा घेत दोषी अधिकाऱ्यांनी दीर्घ रजा घेतल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुढील दोन दिवसांत ती पूर्ण करू, असे सांगून रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी मोकळे झाले. रेल्वेच्या पुण्यातील जागांवरील धोकादायक होर्डिंग, त्यांची पाहणी, त्या बाबतची कार्यवाही, या बाबतच्या प्रश्‍नांनाही रेल्वे प्रशासनाने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. या बाबत पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या प्रतिक्रियेसाठी मंगळवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मोबाईलवर पाठविलेल्या मेसेजलाही त्यांनी उत्तर दिले नाही.

संबंधित अधिकारी रजेवर गेल्यामुळे चौकशीला उशीर झाला आहे.  या बाबतचे तपशील पुणे विभागाकडून मिळतील. 
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

सलग सुट्या आल्यामुळे चौकशी समितीला मर्यादा आल्या. परंतु चौकशी समितीचे काम सुरू असून येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होईल. त्यानंतर चार दिवसांत अहवाल सादर होईल. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

बेकायदा होर्डिंगवरील कारवाई थंडावली
मंगळवार पेठेत होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याचा निर्णय  महापालिकेने घेतला होता. मात्र, ही कारवाई थंडावली आहे. यात पाडलेल्या १५० होर्डिंगचा जुनाच आकडा महापालिका प्रशासन सांगत आहे. त्यामुळेच अद्यापही धोकादायक होर्डिंगचे सांगाडे तसेच आहेत. मात्र, बेकायदा होर्डिंग काढण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

शहरात एक हजार ८० अधिकृत, तर ११७ बेकायदा होर्डिंग असल्याची महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे नोंद आहे. मात्र, शहर आणि उपनगरांमध्ये बेकायदा होर्डिंग उभारले असून, ते मोठ्या आकाराचे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत; परंतु काही अधिकारी-ठेकेदारांमध्ये साटेलोटे असल्याने त्यावर कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. मंगळवार पेठेतील दुर्घटनेनंतर बेकायदा होर्डिंग पाडण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार १५ दिवस अधून-मधून कारवाई करीत आकडे वाढविले होते. त्यानंतर मात्र ही मोहीम फारशी पुढे सरकली नाही.

दोन आठवड्यांमध्ये दोषारोपपत्र
मंगळवार पेठेतील होर्डिंग दुर्घटना रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडून दोन आठवड्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. 

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ५ ऑक्‍टोबरला रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळून सिग्नलला थांबलेल्या चार जणांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी या घटनेला जबाबदार असल्याप्रकरणी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. देहूरोड), त्याचा सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (वय ५७, रा. कसबा पेठ), जाहिरात कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालिद फकिह (वय ५४, रा. कोरेगाव रस्ता) यांच्यासह सात जणांना अटक केली होती. संशयित तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्त केले होते. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलिसांकडून सुरू होता. त्यादृष्टीने सुरवातीला तीन तर त्यानंतर उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. याबाबत बंडगार्डन ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर म्हणाले, ‘‘होर्डिंग दुर्घटनेला रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्यांना अटक केली. दोन आठवड्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल.’’

Web Title: make pune safe inquiry into the hoarding incident