महिलांना घरमालक बनवा, अन मालमत्ता करात तीन सवलत मिळवा; पुणे जिल्हा परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune zilla parishad

महिलांना घरमालक बनवा, अन मालमत्ता करात तीन सवलत मिळवा; पुणे जिल्हा परिषद

पुणे : गृहलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या महिलांना घरांच्या मालक बनवा, अन मालमत्ता करात तीन सवलत मिळवा, अशी घोषणा पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केली आहे. जनजागृतीच्या माध्यमातून हा नवा निर्णय आपापल्या गावातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोचवा, असा आदेश झेडपीने सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला आहे. याबाबत कुटुंबप्रमुख आणि महिलांना काय वाटतं, याबाबतचे गावनिहाय अभिप्रायही येत्या १० एप्रिलपर्यंत मागविण्यात आले आहेत.

गावा-गावांतील घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांचे नाव नोंदविणे, याच्या माध्यमातून महिलांना घरांची मालकी देणे आणि मिळकतीत पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान हक्क मिळावा, या तिहेरी उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. दरम्यान, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पुणे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबातील घरांची मालकी महिलांकडे आली आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने गाव पातळीवर गावातील मिळकतीच्या (मालमत्ता) महाफेरफार मोहीम राबविण्यात आली होती. या महाफेरफार मोहिमेत सहा लाख ४२ हजार ८६ घरांच्या सातबारा उतारा आणि आठ अ उताऱ्यांवर महिलांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे. महिलांच्या नावे घरांची मालकी या मोहिमेत जिल्ह्यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यात ७७ हजार ८५ महिलांना घरांची मालकी मिळाली आहे. त्यामुळे या मोहिमेत जुन्नर तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. मिळकतींवर महिलांची मालकी या मोहिमेला सर्वात कमी प्रतिसाद वेल्हे तालुक्यात मिळाला आहे. या तालुक्यातील १५ हजार ७६१ घरे महिलांच्या नावे नोंदली गेली आहे.

जिल्ह्यातील गावा-गावांतील महिलांना घरांची मालकी मिळावी, यासाठी गावा-गावांतील प्रॉपर्टी कार्डवर महिलांचे नाव नोंदविणे, त्याचे वितरण करणे, काही गावांमध्ये अद्ययावत प्रॉपर्टी कार्डचे वाटप करणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आता मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जिल्ह्यातील सर्व घरांच्या सातबारा उताऱ्यावर पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे नाव नोंदविले जाईल. अशी जिल्हा परिषद प्रशासनाला अपेक्षा आहे.

अशी मिळणार मालमत्ता करात सवलत

  • पती-पत्नी व सून आदींच्या संयुक्त नावावरील घरे - तीन टक्के

  • अठरा वर्षे पूर्ण असलेल्या अविवाहित मुलींच्या नावावरील घरे - ५ टक्के

  • घर फक्त महिलांच्या नावे असल्यास - ७ टक्के

  • उद्योगामध्ये महिलांची ८० टक्के भागीदारी असलेल्या मिळकती - ७ टक्के

  • पतीचे निधन झालेल्या महिला आणि तिच्या मुलींच्या नावे घरे - १० टक्के

जिल्ह्यातील कुटुंबांची संख्या

  • जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या - १० लाख ९१ हजार ३०

  • घरांची मालकी महिलांच्या नावे झालेली कुटुंबे - ६ लाख ४२ हजार ८६

  • जिल्ह्यात अव्वल ठरलेला तालुका - जुन्नर (७७ हजार ८५)

  • सर्वात कमी नोंदींचा तालुका - वेल्हे (१५ हजार ७६१)

पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नोंदणी व्हावी आणि महिला या घरांच्या मालक व्हाव्यात, हा या उपक्रमाच्या अंमलबजावणीमागचा उद्देश आहे. जेणेकरून महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ शकेल. यामुळे मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार असली तरी, त्याचा फायदा हा महिला सक्षमीकरणासाठीच होणार आहे.

- सचिन घाडगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, पुणे.

Web Title: Make Women Homeowners Three Concession Property Tax Pune Zilla Parishad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..