'भारतीय मेकअप आर्टिस्ट जगात भारी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते. अशा वैविध्यतेमुळे भारतातील मेकअप आर्टिस्टला योग्य आणि अप्रतिम मेकअप करता येतो, त्यामुळे मेकअप डिझायनर घडतात, असे मत प्रसिद्ध मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केले.

पुणे - परदेशात प्रत्येकाच्या त्वचेचा रंग गोरा किंवा काळा असतो आणि वेगवेगळ्या त्वचेवर कशा पद्धतीचा मेकअप करावा, याचे पुरेसे ज्ञान नसते. याउलट भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते. अशा वैविध्यतेमुळे भारतातील मेकअप आर्टिस्टला योग्य आणि अप्रतिम मेकअप करता येतो, त्यामुळे मेकअप डिझायनर घडतात,’’ असे मत प्रसिद्ध मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित ‘पिफ’मध्ये गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानात ‘डिझायनर- क्रिएटिंग ॲन इल्युजन’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, ‘‘पहिले गुरू बबनराव शिंदे यांचे नाटकाच्या ड्रेपरीचे दुकान होते. तेथूनच पात्राला आवश्‍यक कपडे, मेकअप या सगळ्याविषयी उत्सुकता वाढायला सुरुवात झाली. ज्या काळात मी सुरुवात केली, तेव्हा तंत्रज्ञान फार पुढे गेलेले नव्हते व परदेशी साधनसामग्रीही सहज उपलब्ध होत नसे. त्यामुळे उपलब्ध साधनांमधूनच मार्ग शोधून काम करत असे. नाकासारख्या अवयवाला आकार देण्यासाठी मऊ केलेले मेण वापरणे, झाडांपासून मिळणारा चिक म्हणजे ‘लेटेक्‍स’ त्यापासून मास्क बनवणे, इत्यादी माध्यमातून मी काम करत राहिलो.’’

राष्ट्रीय पुरस्कारने सन्मान
गायकवाड यांच्या चित्रपटांमधील मेकअप करिअरची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील ‘सरदार’या चित्रपटातून झाली. त्यानंतर ‘महात्मा’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक चित्रपटांसाठी मेकअप डिझायनर म्हणून काम केले आहे. हिंदी, मराठी व बंगाली चित्रपटांसाठी गायकवाड यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: makeup designer Vikram Gaikwad