दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी,पशुधनासाठी चारा आणि रोजगाराचे नियोजन करा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी,पशुधनासाठी चारा आणि रोजगाराचे नियोजन करा
Published on: 

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी
चारा, रोजगाराचे नियोजन करा

मंत्री दादा भुसे:मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी १११ पाणी टँकर


ॲग्रोवन वृत्तसेवा

मालेगाव, जि. नाशिक ः संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांना व पशुधनाला पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पुढील दहा महिन्यांचे नियोजन करावे. तसेच जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करावेत, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.

मालेगाव येथे शहर व तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन व ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण १११ पाणीटँकरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, गटविकास अधिकारी सुनील धस यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, की दुष्काळी परिस्थितीत सर्वप्रथम नागरिकांना आणि पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आगामी काळात तापमान व बाष्पीभवन वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन त्यानंतर उपलब्धतेनुसार शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन करावे. धरण व नदीवरील लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्रित चर्चा करून उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घ्यावा. आवश्यकतेनुसार दोन-तीन पाणी आवर्तनांऐवजी एकच आवर्तन उपलब्ध होऊ शकते, याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

दुष्काळाला संधी मानून रोजगारनिर्मितीवर भर

दुष्काळाच्या काळात नागरिकांच्या हाताला काम मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाझर तलाव, रस्ते व अन्य जलसंधारणाची कामे झाली. त्याच धर्तीवर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीकडे आव्हान म्हणून पाहून सकारात्मक नियोजन करावे. गावांच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आराखडे तयार करण्यात आले असून, ग्रामस्थांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे, पाणीटंचाईच्या काळात परस्पर सहकार्य करणे आणि जलसंधारणाच्या कामांत लोकसहभाग वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.