स्वारगेट परिसरात प्रवाशाचा खून करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

स्वारगेट येथील पीएमपी स्थानकाच्या परिसरात चोरट्यास विरोध केल्यामुळे प्रवाशाचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली.

पुणे - स्वारगेट येथील पीएमपी स्थानकाच्या परिसरात चोरट्यास विरोध केल्यामुळे प्रवाशाचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीस गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली. ही घटना तीन सप्टेंबर रोजी घडली होती. 

याबाबत मिऴालेल्या माहितीनुसार,  ऋषीकेश जीवराज कामठे (वय 34, रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात तीन सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नागेश दगडू गुंड (वय 37,रा. केरूळ, तुळजापूर, जि.उस्मानाबाद) यांचा खून झाला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुंड हे एका खासगी वाहनावर चालक म्हणून कामाला होतो. लॉकडाऊन सुरू असताना गुंड हे उस्मानाबाद येथील केरूळ येथे गेले होते. त्यानंतर चालक म्हणून इतर शहरामध्ये प्रवाशांना घेऊन जाण्याचे काम त्यांना मिळाले होते. त्यासाठी ते गावावरुन बसने तीन सप्टेंबरला रात्री पुण्यात आले होते. तेव्हा त्यांचा मित्र कमलाकर घोडकेंना त्यांनी घेण्यासाठी स्वारगेट येथे बोलाविले होते. त्यावेळी चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या कामठे याने गुंड यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील पिशवी, मोबाइल हिसकावणाचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या झटापटीत कामठेने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने गुंड यांच्यावर वार केले आणि तो तेथून पसार झाला. घोडके तेथे दाखल झाल्यानंतर गुंड यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्याचवेळी गुंड यांना रुग्णालयात दाखल केले पण उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. त्यावेळी सराईत गुन्हेगार कामठे हा कोरोनाचा संसर्गानंतर येरवडा कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. त्यानेच स्वारगेट येथील प्रवाशाचा खुन केल्याची माहिती पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्यास पकडले, तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) संभाजी कदम यांनी दिली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आदी उपस्थित होते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man arrested for killing passenger in Swargate area