

मंचर, ता. १५ : शेती आणि स्थानिक परिस्थितीचा विचार न करता मंचर नगरपंचायतीने केलेल्या विकास आराखड्यात अनेक ठिकाणी अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होऊन त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ येऊ शकते. नागरिकांना विश्वासात घेऊन नव्याने विकास आराखडा तयार करावा. सध्याचा विकास आराखडा रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा संजय थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
मंचर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात रविवारी (ता. १५) विकास आराखड्याच्या विरोधात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ग्रामस्थांनी वरील इशारा दिला. या वेळी राजाराम बाणखेले म्हणाले की, "माझी जिरवण्यासाठी माझ्या घरावरूनच रस्ता काढला असून माझ्या जमिनीत मैदानासाठी ३० गुंठे जागा आरक्षित केली आहे. असाच प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला आहे. सध्याचा विकास आराखडा पूर्णपणे चुकीचा असून तो रद्द करावा. मंगळवार (ता. १७) पासून घरोघरी जाऊन विकास आराखड्याबाबत हरकती नोंदविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्री उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू इनामदार यांनी रस्ते रुंदीकरणामुळे अनेक नागरिकांची घरे बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली. नवनाथ थोरात व कुणाल बाणखेले यांनी प्रस्तावित विकास आराखड्यामुळे मंचरमधील नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सादरीकरण केले. उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून आराखड्याला विरोध दर्शविला. आराखडा रद्द करून नागरिकांच्या सूचना व हरकती विचारात घेऊन नव्याने नियोजन करावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. बैठकीला नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, नगरसेवक वसंतराव बाणखेले, धनेश मोरडे, शिवाजीराव राजगुरू, उर्मिला मोरडे, मालती थोरात, मीरा बाणखेले, सलीम इनामदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
चित्रफितीद्वारे सादरीकरण
ॲड. नीलेश आंधळे यांनी चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. नागरिकांनी विकास आराखड्याबाबत लेखी हरकती नोंदवाव्यात. हा प्रश्न नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.