मंचर नगरपंचायतीचा कारभार ''राम भरोसे''
मंचर, ता. ४ : मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीत अधिकारी व कर्मचारी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी न करता आणि रजेचा अर्ज न देता गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी सोमवारी (ता. २) सायंकाळी अचानक केलेल्या तपासणीत ही बाब समोर आली.
राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गरकळ यांच्याकडे मंचर नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांनी कार्यालयाला भेट दिली असता, काही कर्मचारी अनुपस्थित आढळले. हजेरीपत्रकाची तपासणी केली असता संबंधितांनी स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या किंवा रजेचे अर्जही दिले नव्हते. उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांच्या उपस्थितीत गरकळ यांनी अशा नोंदींसमोर ‘गैरहजर’ असा शेरा मारला. यापुढे पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाणे बंधनकारक असल्याचे त्यांनी बजावले. दरम्यान, नगराध्यक्ष राजश्री गांजाळे आणि उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांच्या निवडीनंतर मुख्याधिकारी गोविंद जाधव दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. तर अतिरिक्त कार्यभारामुळे कार्यालयीन कामकाजात शिथिलता आल्याची चर्चा होती.
मंचर नगरपंचायतीत लवकरच बायोमेट्रिक मशिन बसवण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक असेल. दर आठवड्याला कामकाजाचा आढावा घेतला जाईल. नागरिकांची कामे तत्परतेने न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- लक्ष्मण थोरात, उपनगराध्यक्ष, मंचर नगरपंचायत
दृष्टिक्षेपात:
अधिकाऱ्यांची संख्या : ८
कर्मचाऱ्यांची संख्या : ४०
स्वच्छता कामगारांची संख्या : ६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

