मंचर - रान भाज्यांच्या प्रदर्शनाला दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wild Vegetable Exhibition

मंचर : रान भाज्यांच्या प्रदर्शनाला दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली भेट

मंचर - येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमीत्त वनस्पतीशास्त्र विभागा (पदवी, पदव्युत्तर व पीएच. डी.शोधन केंद्र) तर्फे शुक्रवारी (ता. २३) भरविण्यात आलेले रानभाज्या प्रदर्शनाला दोन हजारहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भेट दिली. पालक व निसर्गप्रेमीं मोठ्यासंख्येने येथे आले होते.

प्रदर्शनाचे उदघाटन महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव आवारी यांच्याहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, ज्ञानशक्ती विकास वाहीनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे, मुख्याध्यापीका सलमा शेख, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. बोलभट उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील व मंचर परिसरातील ५० रानभाज्या होत्या. त्यामध्ये केना, कोंबडा आंबोशी, तांदुळजा, आघाडा, टाकळा, भारंगी, कोहळा, पाथरी, भोकर, चिल, काठेमाठ, रानकेळी, रानअळू, डुक्कर कंद आदी रानभाज्यांचा समावेश होता. वनस्पतीशास्त्र विभागातील विदयार्थ्यानी उपस्थिताना रानभाज्यांची शास्त्रीय नावे व विविध आजारावर असलेली उपयुक्तता याबाबतची सविस्तर माहिती दिली.

'आपले पूर्वजांच्या काळात सद्यस्थितीतील रुग्णालये ग्रामणी भागात नव्हती. विविध आजारांसाठी रानभाज्या व आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर प्रमुख्याने केला जात होते. आज भरविलेल्या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांची नव्याने ओळख झाली व त्याचा उपयोग समजला.' असे काळे व अवारी यांनी सांगीतले.

प्रा.डॉ नामदेव आडमुठे, प्रा.विलास कुमावत, प्रा. अभिषेक भोर, प्रा. पी. डी. नाईक, प्रतिक्षा पवार, गीता कदम, दादा शिंदे, कचरू खळदकर यांनी व्यवस्था पहिली. प्रास्ताविक डॉ. बी. पी. गार्डी, सुत्रसंचालन प्रा. श्रद्धा महाकाळ, प्रा. कैलास एरंडे यांनी केले. प्रा. विलास कुमावत यांनी आभार मानले.

'अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या आवारात रानभाज्या व दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन स्वतंत्र जागेत केले जाईल. पथदर्शी प्रकल्प उभारला जाईल. त्याचा फायदा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल.'

- डॉ. के. जी. कानडे, प्राचार्य अण्णासाहेब आवटे महाविद्यालय