Crime News : मंडईतील गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mandai firing case Three arrested pune police action crime

Crime News : मंडईतील गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक

पुणे : मंडईतील रामेश्वर चौक परिसरात पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी संशयित आरोपींकडून पिस्तुल जप्त केले आहे.

अक्षय वल्लाळ याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली.रूपेश राजेंद्र जाधव (वय 24, रा. कुंभारवाडा, नाना पेठ), प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ येमूल (वय 22 , रा. नाना पेठ), बाळकृष्ण विष्णु गाजुल (वय 24, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तर शेखर अशोक शिंदे (वय 32) हा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाळकृष्ण गाजुल हा मुख्य संशयित आरोपी आहे. मंगळवारी (ता.27) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या शेखर यास अडवून टोळक्‍याने त्याच्यावर पिस्तुलातुन गोळ्या झाडल्या,

तसेच त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत शेखर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, भरवस्तीत गोळीबार व खुनाच्या प्रयत्नाची घटना घडल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी फरासखाना पोलिस व गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडून समांतर तपास सुरु होता.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी रुपेश व त्याचा साथीदार प्रथमेश हे दोघेही कोंढवा परिसरात थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली, तर त्यांचा साथीदार बाळकृष्ण यास मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तुल जप्त केले.

काही महिन्यांपुर्वी झालेल्या अक्षय वल्लाळ याच्या खून झाला होता. किशोर शिंदे व त्याच्या साथीदारांनी हा खुन केल्याचा संशय वल्हाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल यास होता. त्यातुनच गाजुल याने कट रचून किशोरचा भाऊ शेखर याच्यावर जीवघेणा हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.