

PNE26W60967
मंगळवेढा : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार समाधान आवताडे.
---
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला गती देणार
आमदार आवताडे : मार्चपूर्वी दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोचविण्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा शहर, ता. २२ : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती देऊन मार्च २०२७ पूर्वी दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आमदार समाधान आवताडे यांनी दिले. पहिल्या टप्प्यातील पंपहाऊस, मुख्य ऊर्ध्वगामी नलिका आणि वितरण व्यवस्थेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
आमदार आवताडे यांनी बुधवारी (ता. २१) योजनेच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी कामातील अडथळ्यांची माहिती घेऊन ते दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बैठकीला अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता मुन्नोळी, उपअभियंता दुधाळ, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, करुणा शिवशरण, जनार्दन शिवशरण, उपनगराध्यक्ष येताळा भगत, बाळासाहेब ताड आणि अंकुश पडवळे उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात सुमारे १११ कोटी रुपयांची कामे समाविष्ट आहेत. यामध्ये पंपहाऊसचे बांधकाम, ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम आणि शेलवेवाडी येथे वितरण कुंड तयार करण्याचा समावेश आहे. गुंजेगाव येथील पंपहाऊसच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ७८ कोटी ४३ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये पंपगृह, संरक्षक भिंत, बॅलन्सिंग टँक, लेंडवे चिंचाळे येथील ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक दोन, मुख्य गुरुत्वीय नलिका आणि वितरण व्यवस्थेचा समावेश आहे. योजना कार्यान्वित करणे, पाच वर्षे परिचालन व देखभाल-दुरुस्ती, शेतकऱ्यांना प्रशिक्षण, पाणी वापर संस्थांची स्थापना आणि वितरण व्यवस्था संबंधित संस्थांकडे हस्तांतरित करण्याची कामेही या टप्प्यात पूर्ण केली जाणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही आवताडे यांनी दिल्या. काही ठिकाणी हस्तांतरणासंदर्भातील बाबी अपूर्ण असल्याने संबंधित ठिकाणांची मोजणी तातडीने पूर्ण करण्याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना सांगण्यात आले.
---
कोट
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामात कोणतेही अडथळे राहू नयेत, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने पूर्ण करून यंदाच्या उन्हाळ्यात योजना कार्यान्वित करण्याचा आपला प्रयत्न आहे. मार्च २०२७ पूर्वी दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोचविण्याच्या दृष्टीने दिवसनिहाय नियोजन करून कामे जलद गतीने पूर्ण करावीत.
- आमदार समाधान आवताडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.