वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बस गाड्यामुळे मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

वारंवार नादुरुस्त होणाऱ्या बस गाड्यामुळे मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Published on

BHM26B02165
भोसे (ता. मंगळवेढा) मंगळवेढा-हुन्नूर-रेवेवाडी मार्गावर विद्यार्थी वाहतूक करणारी नादुरुस्त झालेली मंगळवेढा आगाराची बस.

मंगळवेढा-जत मार्गावर बस बंद पडल्याने नुकसान
भोसे, ता. २७ ः मंगळवेढा आगाराच्या मंगळवेढा-हुन्नूर-जत मार्गावर प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बहुतांश बसगाड्या आठवड्यातून दोन तीन वेळा रस्त्यात नादुरुस्त होत असल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांबरोबर शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मंगळवेढा हुन्नूर-मार्गे जत हा महत्वाचा व प्रवाशांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असणारा मार्ग आहे. या मार्गावरून मंगळवेढा-नंदेश्वर-भोसे-हुन्नूर परिसरातील शाळातील विद्यार्थ्यांची आवक जावक मोठ्या प्रमाणात असते. प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना मंगळवेढा आगारातून या मार्गावर सोडल्या जाणाऱ्या बस मात्र आठवड्यातून किमान तीन-चार वेळा रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मंगळवेढा आगारातील ग्रामीण भागात चालवल्या जाणाऱ्या बस जुन्या झाल्या आहेत. काही गाड्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अशा जुनाट व कालबाह्य होत आलेल्या बस विद्यार्थी वाहतुकीसाठी सोडल्या जात असल्याने व या बस आठवड्यातून दोन तीन वेळा रस्त्यातच नादुरुस्त होत असल्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकत नाहीत. सायंकाळच्या वेळी बस नादुरुस्त झाल्यानंतर आसपासच्या गावातून व वाड्या वस्त्यावरून आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना घरी जायला रात्रीची वेळ येत आहे.

कोट
- मंगळवेढा आगाराच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस जुन्या असल्यामुळे वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मंगळवेढा आगार प्रमुखांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मार्गावर सुस्थितीत असणाऱ्या बस गाड्या सोडाव्यात.
- बिराप्पा पुजारी, पालक, हुन्नूर

Marathi News Esakal
www.esakal.com