

माणदेशाला येणार सोन्याचे दिवस
ग्रीन कॉरिडॉर अन् शक्तिपीठमुळे जिल्ह्याचा पूर्व भाग होणार ‘ग्लोबल’; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींची भरपाई
उमेश बांबरे : सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. १२ : जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळखले जाणारे माण, खटाव आणि फलटण हे तालुके आता विकासाच्या महामार्गावर धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. केंद्र सरकारचा ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ आणि राज्य सरकारचा ‘शक्तिपीठ महामार्ग’ हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प या भागातून जात असल्याने या तालुक्यांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. कधीकाळी रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या या मातीला आता सोन्याचे दिवस येणार असून, हे तालुके जागतिक नकाशावर ठळकपणे उमटणार आहेत.
आर्थिक सुबत्ता आणि उलाढाल
या दोन महामार्गांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन होत आहे. यातून हजारो शेतकऱ्यांच्या पदरात कोटींची नुकसानभरपाई पडणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी रोखड उपलब्ध होईल. केवळ जमीन विक्रीचेच पैसे नव्हे, तर महामार्गांच्या कामामुळे स्थानिक पातळीवर खडी, वाळू, वाहतूक आणि मजुरीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. महामार्ग पूर्ण झाल्यावर या भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडतील, ज्यामुळे येथील लोकांचा आर्थिक स्तर कमालीचा उंचावणार आहे.
औद्योगिक आणि कृषी क्रांती
या महामार्गांमुळे दळणवळण वेगवान होईल. फलटणचा साखर पट्टा आणि माण-खटावमधील डाळिंब, आले यांसारखी पिके आता थेट मुंबई, चेन्नई किंवा सुरतच्या बाजारपेठेत काही तासांत पोहोचतील. महामार्गालगत लॉजिस्टिक पार्क, कोल्ड स्टोरेज आणि नवीन उद्योगधंदे उभारले जातील. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे- मुंबईकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही.
चौकट
---------
विकासाचे दोन महास्तंभ
सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर : हा मार्ग फलटण, माण आणि खटावच्या पूर्व भागातून जात असून, यामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारताशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग : हा मार्ग धार्मिक पर्यटनाला चालना देणारा ठरेल. यामुळे पंढरपूर, तुळजापूर आणि कोल्हापूर यांसारखी तीर्थक्षेत्रे जवळ येऊन या भागात हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल.
चौकट
जागतिक नकाशावर ‘माणदेश’
माण आणि खटाव हे तालुके कायमच प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत राहिले. मात्र, आता या महामार्गांमुळे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा येथे पोहोचत आहेत. भविष्यात हे तालुके ‘ट्रान्स्पोर्ट हब’ म्हणून ओळखले जातील. ‘दुष्काळी’ हा शिक्का पुसून ‘प्रगत’ म्हणून या भागाची नवी ओळख निर्माण होत आहे.
..............................
काय आहे ‘सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’?
उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा देशातील एक महत्त्वाचा आर्थिक मार्ग आहे. हा रस्ता जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण नसून पूर्णपणे नवीन आखणी आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांतून हा मार्ग जातो. महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि सातारा (फलटण, माण, खटाव) जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे.
हा महामार्ग सहापदरी असून, ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील. यामुळे सुरत ते चेन्नई दरम्यानचे अंतर सुमारे ४०० किलोमीटरने कमी होणार आहे. यातून औद्योगिक मालाची वाहतूक वेगवान होईल. सातारा जिल्ह्यातील फलोत्पादन (डाळिंब, आले, द्राक्षे) थेट बंदरांपर्यंत जलद पोहोचण्यास मदत होईल.
............................
‘शक्तिपीठ महामार्ग’ (नागपूर-गोवा)?
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा हा राज्यातील प्रदीर्घ महामार्ग आहे. याला ‘शक्तिपीठ’ नाव देण्याचे कारण म्हणजे हा मार्ग राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडतो. व्याप्ती : नागपूर ते गोवा या ८०२ किलोमीटरच्या प्रवासात हा मार्ग पवनार, माहूर, तुळजापूर, पंढरपूर, औंध (खटाव, सातारा) आणि कोल्हापूर यांसारख्या धार्मिक स्थळांना स्पर्श करतो. हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा असून, तो १२ जिल्ह्यांमधून जातो. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास जो सध्या १८-२० तास लागतो, तो अवघ्या आठ ते दहा तासांवर येईल. धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. महामार्गालगत नवीन कृषी समृद्धी केंद्रे उभारली जाणार असल्याने स्थानिक रोजगार वाढेल.
..................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.