माओवादी कनेक्शन प्रकरण; पुढील सुनावणी आता...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

- कागदपत्रे व सुनावणी मुंबईत वर्ग करण्यास न्यायालयाची मंजुरी.

पुणे : एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यास येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी यापुढे मुंबईत होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोपी आणि जिल्हा सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत एनआयएने केलेला अर्ज मंजूर केला आहे. कलम 22 नुसार राज्याला तपासाचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. तर कलम 11 मध्ये याबाबतचे अधिकार केंद्राला आहेत. एनआयएकडे तपास गेल्याने त्याची सुनावणी घेण्यासाठी पुण्यात देखील न्यायालय आहे. याबाबत गुरुवारी देण्यात आलेले विविध निकालाचे संदर्भ या प्रकरणात लागू होत नाही, असे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले होते. तर विशेष 
एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देण्याचे अधिकार सध्या सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.

न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. गुन्ह्याचा तपास एनआयएकडे देण्यास राज्य शासनाने गुरुवारी मान्यता दिल्याने पुणे शहर पोलिसांनी तपास आणि मुद्देमालाची कागदपत्रे मुंबई एनआयए विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी सूनवणी सुरू असलेल्या न्यायालयात ना हरकत पत्र दिले होते.

सुनावणी वर्ग झाल्याने आता एनआयए पुन्हा नवीन तपास करणार का? की झालेल्या तपासातून सुटलेल्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

जामीन मिळण्याचा शक्‍यता दुरावली? 

या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडेच असता किंवा एसआयटी स्थापन झाली असती तर आरोपींना जामीन मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र आता एनआयएकडे तपास गेल्याने आणि सुनावणी मुंबईत होणार असल्याने आरोपींना जामीन मिळण्याची शक्‍यता दुरावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maoist Connection Case Next Hearing in Mumbai