

JLN26B07412
अंतरवाली सराटी (ता. अंबड) ः उपोषणस्थळी उपस्थित मराठा समाजबांधव.
जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात
सरकार विश्वासघात करत असल्याचा आरोप
-
सकाळ वृत्तसेवा
जालना/वडीगोद्री, ता. २९ : आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले असून, अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे त्यांच्या बाराव्या उपोषणाला शनिवारी (ता.२९) सुरुवात झाली. ‘आमचा हा लढा सुरू असून, सरकार वारंवार विश्वासघात करत आहे,’ असा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच, मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे शनिवारी सकाळी उपोषणस्थळी आगमन झाल्यावर समाजबांधवांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. गावातील ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेऊन जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी उपस्थितांकडून ‘पाटील-पाटील’ नावाचा जल्लोष करण्यात आला. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. दरम्यान, ‘‘आमचे मुंबईत यायचे ठरले की आम्हाला नोटिसा येतात, या सरकारला आता मराठा समाजच नीट करणार आहे. सध्या अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू आहे, त्यामुळे समाजाचे आमदार, खासदार, मंत्री, गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील नेते, या सर्वांनी सहभागी व्हावे. जे सहभागी होणार नाहीत, समाज त्यांची नोंद घेणार आहे,’’ असे जरांगेंनी सांगितले.
-----
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार
उपोषणादरम्यान जरांगे यांनी उपस्थित समाजबांधवांना ‘मुंबईत येणार का?’ अशी विचारणा करताच, सर्वांनी जल्लोष करत होकार दर्शविला. दरम्यान, ‘मुंबईत जाऊ, वर्षा बंगल्यावर जाऊ, फडणवीस साहेब काहीही म्हणणार नाही,’ असा खोचक टोला जरांगेंनी लगावला. तसेच अंतरवाली सराटीत मागणी मंजूर झाली नाही तर आपण मुंबईत येणार. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिला.
जरांगेंना पोलिसांची नोटीस
मनोज जरांगे यांना गोंदी पोलिसांकडून बीएनएसएस १६८ प्रमाणे शुक्रवारी ( ता. २८) रात्री नोटीस देण्यात आली आहे. उपोषणादरम्यान वाहतुकीस अडथळा येणार नाही, ध्वनी प्रदूषण कायदा आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. उपोषणादरम्यान, इतर जातींच्या भावना दुखावतील असे भाष्य आणि चिथावणीखोर भाषण न करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
----
जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
- ५८ लाख कुणबी नोंदींप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र तत्काळ वाटप करावे.
- हैदराबाद गॅझेटिअरनुसार मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करून जातवैधता कशी देणार, हे स्पष्ट करावे.
- सातारा, कोल्हापूर संस्थान,औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा तत्काळ जीआर काढून अंमलबजावणी करावी.
- मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.
- मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे.
- कुणबी प्रमाणपत्रासाठी ज्यांनी अर्ज केले, त्यांना आज प्रमाणपत्र देऊन जातवैधता द्यावी.
- मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती, सोयी सुविधा देण्याचा जो जीआर काढण्यात आला, त्या जीआरची अंमलबजावणी करावी.
- ‘सारथी’च्या सर्व योजना सुरू कराव्यात. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचे पैसे तत्काळ द्यावे.
- आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांना नोकरी देऊन आर्थिक निधी द्यावा.
- शिंदे समितीला पुन्हा कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच रेकॉर्ड तपासण्याचे सांगावे.
- जरांगेईडब्ल्यूएस, एसईबीसी, ईएसबीसीमधून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात.
- अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत व्याज परताव्याची संपूर्ण रक्कम आजच्या आज द्यावी.
- सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तत्काळ करावी.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.