अंतरवाली सोडा; आता मुंबई गाठा

अंतरवाली सोडा; आता मुंबई गाठा
Published on

सकाळ वृत्तसेवा
जालना,वडीगोद्री, ता. ३१ : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज आंदोलकांना मुंबईकडे जाण्याची साद घातली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले. ‘‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे आता आंदोलनस्थळी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील गर्दी कमी झाली तरी चालेल; पण सात सप्टेंबरपासून मुंबईकडे निघा. शक्य असेल त्यांनी आपापल्या मुंबईतील पाहुण्यांच्या घरी जाऊन राहा. १२ सप्टेंबरपर्यंत गणेश दर्शन घ्या. मी मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद मैदानावर किंवा ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल व्हा’’, असे आवाहन त्यांनी केले.
आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्यांप्रश्नी जरांगे यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘आम्ही मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत दोन ते तीन लाख मराठ्यांची घरे आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील मराठे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईत आंदोलनासाठी येणाऱ्या मराठ्यांनी गनिमी कावा वापरावा. मुंबईतील पाहुणे, मित्रांशी संपर्क साधून सात सप्टेंबरपासून मुंबईत दाखल होण्याची तयारी करा. सात ते बारा सप्टेंबरदरम्यान मुंबईत नातेवाइकांकडे राहा. नातेवाइकांकडे येऊन राहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर बिनधास्त पोलिस ठाण्यात जा. जामीन घेऊ नका; उलट येथे राहण्याची व्यवस्था होईल. मात्र, मी मुंबईमध्ये येईपर्यंत आझाद मैदान किंवा ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊ नका.’’
मुंबईतील मराठ्यांनी १२ ते ३० सप्टेंबरदरम्यान आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी मिळवावी. परवानगी मिळाली नाही तरी उपोषणाला बसणार. कोण काय वाकडे करते ते पाहू, असा इशाराही त्यांनी दिला.

एकनाथ शिंदेंना उतरती राजकीय कळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे यांनी पुन्हा टीका केली. ते म्हणाले, ‘‘एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या लाखोंच्या सभा होत होत्या; आता त्या पाच हजारांच्या उपस्थितीवर आल्या आहेत. त्यांना आता राजकीय उतरती कळा आली आहे. आता त्यांना राजकीय अवकळा कळेल. ५८ लाख कुणबी नोंदी नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन सांगावे. ५८ लाखांतील नोंदी कमी झाल्या, तर मराठे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपवतील.’’


मुंबईत चर्चा शक्य नाही
राज्य शासनाला अंतरवाली सराटी येथे चर्चा करता येईल. मात्र, मुंबईत आल्यानंतर चर्चा शक्य नाही. राज्य शासनाने रद्द केलेली चार प्रमाणपत्रे द्यावीत, हाच तोडगा आहे. कुणबी नोंदीनुसार निघालेले प्रमाणपत्र रद्द होत नाही, मग ती का रद्द केली? विनाकारण न्यायालयात जाण्याची वेळ आमच्यावर का आणली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांवरही टीका
हैदराबाद गॅझेटसंदर्भातील ‘जीआर’ संविधानिक पद्धतीने निघाला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संविधानाची भाषा वेगळी आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला, भाजपमध्ये प्रवेश केला, अशांना शिक्षा होत नाही. जे खरे आहेत, त्यांना ‘जेल’ होते, असे त्यांचे संविधान आहे, अशी टीका जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.

शिष्टमंडळ आज येण्याची शक्यता
मागण्यांवर चर्चेसाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ मंगळवारी (ता. एक) अंतरवाली सराटी येथे येण्याची शक्यता आहे. सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या आमदार प्रसाद लाड यांचा अंतरवाली सराटी दौरा निश्चित झाला असून मंत्री उदय सामंत, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे भेटीसाठी येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com