

मातृभाषा कन्नड...मराठीचा लावणार लळा!
दक्षिण सोलापूरमधील २१ शाळांत अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह
१९ साहित्यिकांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ ः दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांची मातृभाषा कन्नड, तर शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. भाषेतील या अंतरामुळे विद्यार्थ्यांना मराठी शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांच्यात मराठी भाषेविषयी गोडी निर्माण करण्याचा उपक्रम विश्वमंगल मराठी फाउंडेशनने हाती घेतला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त तीन ते नऊ ऑक्टोबरदरम्यान तालुक्यातील २१ जिल्हा परिषद शाळांमध्ये अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील दक्षिण सोलापूर तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गावे वगळता बहुतांश गावांमध्ये कन्नड मातृभाषिकांची संख्या अधिक आहे. या गावांतील मुले मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. त्यामुळे मराठी भाषेची गोडी, आत्मीयता आणि अभिव्यक्ती वाढविण्याच्या दृष्टीने फाउंडेशनने हा उपक्रम आखला आहे.
सप्ताहात साहित्यिक आणि मान्यवर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मराठीचा समृद्ध वारसा, अभिजात परंपरा आणि भाषेचे महत्त्व गप्पा-गोष्टींतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. केवळ भाषणांपुरता उपक्रम मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यासाठी प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध आणि नाटिका स्पर्धांचे आयोजन केले आहे. विजेत्यांना गोष्टींची पुस्तके आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात येणार आहे.
सोलापूर शहरातील १९ साहित्यिकांसह मान्यवरांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. पुढील वर्षी कन्नड मातृभाषिक विद्यार्थ्यांनी बालनाट्य स्पर्धेत सहभागी व्हावे, या उद्देशानेही आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे.
गावोगावी पोहोचणार मराठीचा गोडवा
- ३ ऑक्टोबर : वडकबाळ, कारकल, कुसुर, खानापूर, तेलगाव
- ५ ऑक्टोबर : राजूर, कुरघोट
- ६ ऑक्टोबर : टाकळी, हत्तरसंग, कुडल, भंडारकवठे, बाळगी, लवंगी, यत्नाळ, इंगळगी
- ७ ऑक्टोबर : बरूर, चिंचपूर
- ८ ऑक्टोबर : होनमुर्गी, सादेपूर, विंचूर
- ९ ऑक्टोबर : इंगळगी
भाषेची गोडी स्पर्धांतून
- प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा
- निबंध व नाटिका स्पर्धा
- गप्पा-गोष्टींतून मराठीचा परिचय
- गोष्टींची पुस्तके व शालेय साहित्य देऊन गौरव
- पुढील वर्षी बालनाट्य स्पर्धेत सहभागाचे उद्दिष्ट
कोट
PNE26W54614
- कन्नड मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांत मराठी भाषेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी निबंध, नाटिका यांसारखे छोटे-छोटे मनोरंजक उपक्रम आयोजित केले आहेत.
- सुभाष देशमुख, आमदार, सोलापूर दक्षिण
--
PNE26W54613
-साहित्यिकांसह मान्यवरांच्या सहयोगातून २१ जिल्हा परिषद शाळांत हा सप्ताह राबविला जाणार आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणार आहोत. पुढील वर्षी कन्नड भाषिक विद्यार्थी बालनाट्य स्पर्धेत उतरतील, या दृष्टीने तयारी सुरू आहे.
- शोभा बोल्ली, संयोजिका, अभिजात मराठी भाषा संवर्धन सप्ताह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.