esakal | प्राकृत आई मायमराठीला नडतेय?
sakal

बोलून बातमी शोधा

प्राकृत आई मायमराठीला नडतेय?

- अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राचे पाच निकष

प्राकृत आई मायमराठीला नडतेय?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : मराठीची आई कोण, संस्कृत की महाराष्ट्रीय प्राकृत या वादाबरोबरच मराठीवर संस्कृतचे आईपण लादण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचा अभिजात दर्जा दिल्लीमध्ये अडकला आहे. साहित्य परिषदेने मराठीची आई असलेल्या प्राकृत भाषेला हा दर्जा देण्याचा ठरावही मंजूर केला आहे. त्यामुळे मराठीला हा दर्जा देता येणार नाही, असा प्रवाद परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मराठीचे वैभव आणि अभिजातता दाखविणारा 435 पानी अहवाल केंद्र सरकारला पाठविला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्राने तो साहित्य परिषदेकडे पाठविला. परिषदेने त्यासाठी भाषातज्ज्ञांची समितीही नेमली. या समितीने 5 फेब्रुवारी 2015 ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे; तसेच अभिजात दर्जा देण्याविषयीचे केंद्राचे सर्व निकष मराठीने पूर्ण केल्याचेही मान्य केले. तरीही अद्यापही दर्जा देण्यात आलेला नाही. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. 

दर्जा का दिला जात नाही, याबद्दल दिल्लीत कानोसा घेतला असता, प्रामुख्याने दोन कारणे समोर आली. एक म्हणजे सर्व भाषा या संस्कृतमधून जन्माला आल्या आहेत. त्या भाषेला आधीच हा दार्जा दिला आहे. दुसरे म्हणजे प्राकृत ही मराठीची आई असेल, तर तिलाच अभिजात दर्जा देण्याचा ठराव झालेला असल्याने मराठीला हा दर्जा कसा द्यायचा, असा प्रश्‍न आहे. 

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसचिव यांनी त्यास दुजोरा दिला. ते म्हणाले, "साहित्य परिषदेच्या नियामक मंडळाने मी तत्कालीन सांस्कृतिक मंत्रालयाचा सहसचिव असताना प्राकृत आणि पाली भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ठराव मंजूर केला आहे.''प्राकृत ही संस्कृतमधून जन्माला आली की नाही, हे तपासण्यासाठी दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थानमध्ये विचारणा केली असता, तेथील भाषा अभ्यासक डॉ. रजनीश शुक्‍ल यांनीदेखील हा दावा खोडून काढला. ते म्हणाले, "प्राकृत आणि संस्कृत या दोन्ही भाषांचा उगम एकमेकांमधून झालेला नाही.'' 

अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राचे पाच निकष आहेत, ते मराठीने पूर्ण केले आहेत. याशिवाय संस्कृत ही मराठीची आई नाही; तसेच प्राकृत ही मराठीची आई असून, ती संस्कृत पूर्वीची भाषा आहे. याचे इसवी सनापूर्वीचे असंख्य पुरावे दिले आहेत. साहित्य अकादमीच्या भाषातज्ज्ञ समितीनेही मराठीला अभिजात दर्जा देण्याची शिफारस केली आहे. तरीही दर्जा न मिळणे हा मराठीवर अन्याय आहे.''

- हरी नरके, समन्वयक, अभिजात मराठी भाषा समिती 

अभिजात मराठी भाषा समितीने अहवाल देताना संस्कृत ही मराठीची मावशी दाखवली आहे, तो मोठा दोष आहे. यामुळे मराठी ही स्वतंत्र भाषा असल्याचे सिद्ध होत नाही. ते सिद्ध करणारे अनेक पुरावे असल्याने या समितीने त्यांच्या अहवालास सुधारित जोड दिली पाहिजे.''

-  संजय सोनावणी, भाषा अभ्यासक.

loading image
go to top