मराठी भाषा लाल फितीतून मोकळी होणार?

सुशांत सांगवे
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार

वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार

पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे आणि राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर व्हावे, या तीन प्रमुख मागण्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकारदरबारी रखडल्या आहेत; पण साहित्य क्षेत्रातून सुरू असलेले प्रयत्न आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हे तीनही प्रश्‍न नव्या वर्षाच्या सुरवातीला लालफितीतून मोकळे होतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याचे सर्व निकष राज्य सरकारच्या अभिजात भाषा समितीने पूर्ण केले आहेत. पण, केंद्र सरकारने अद्याप याला मान्यता दिली नाही. त्यामुळे साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून लेखकांचे अनेक गट अभिजात भाषेसाठी झटत आहेत. मराठी भाषेचे विद्यापीठ आणि भाषा धोरणासाठी लेखकांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच पालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने सरकारतर्फे मराठी भाषेसंदर्भात या घोषणा होऊ शकतात, अशीही चर्चा साहित्यवर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे नव्या वर्षात कागदावरील या मागण्या प्रत्यक्षात उतरतील, अशी आशा आत्तापासूनच निर्माण झाली आहे. मराठीला अभिजात दर्जा, मराठीचे विद्यापीठ, मराठी धोरण जाहीर झाले तर भाषेचे अनेक प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत निवडणुकीनंतर ‘परिवर्तन’ झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी, संस्थांशी जोडून घेणारे उपक्रम सुरू केले आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून परिषदेचे कार्य तरुणांपर्यंतही पोचत आहे. या कामात परिषदेने सातत्य ठेवले, तर परिषदेचा चेहरा अधिक व्यापक होईल. वार्षिक कार्यक्रमांच्या पुढे जाऊन ‘संशोधन विभाग’ आणि विश्‍वकोश मंडळाचे ‘ज्ञानमंडळ’ परिषदेत सुरू झाले. या कामांबरोबरच परिषदेने पुढचे वर्ष ‘भाषा, शुद्धलेखन, शाखा सबलीकरण’ यासाठी खर्च करायचे ठरवले आहे. अलीकडील संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे पुस्तकही नव्या वर्षात परिषदेतर्फे येणार आहे. शिवाय, तरुणांना जोडून घेण्यासाठी महाविद्यालयांबरोबर ‘साहित्य सामंजस्य करार’ परिषद करणार आहे. हे उपक्रम नव्या वर्षात वेगळे ठरणार आहेत.

साहित्य परिषद वेगाने बदलत आहे. लोकाभिमुख होत आहे; पण दुसरीकडे नाट्य परिषदेची कामे वेगाने कमी होत आहेत. लोकांपासून नाट्य परिषद दूर राहत आहे. हे चित्र नव्या वर्षात बदलण्यासाठी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच मानसिकता बदलायला हवी. त्यातच कोथरूडमध्ये नाट्य परिषदेची नवी शाखा सुरू झाली आहे. या शाखेला येत्या काही वर्षांत पुण्यात नाट्य संमेलनही आयोजित करायचे आहे. त्यामुळे शहरातील शाखेने आवश्‍यक ते बदल करून ‘ॲक्‍टिव्ह’ व्हायला हवे. हीच अपेक्षा बालकुमार साहित्य संस्थेकडूनही आहे. जुनी संस्था बंद करून नवी संस्था सुरू केली; पण नवी संस्था बेकायदेशीर आहे... अशा वेगवेगळ्या चर्चेमुळे आणि अंतर्गत राजकारणामुळे संस्थेचे मुख्य काम बाजूला राहत आहे; पण नव्या वर्षात ‘बालकुमार’ सुरू होणे आणि या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सुरू होतील, अशी शक्‍यता आहे.

असे होते २०१६

  • संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड, पंतप्रधानांवरील टीकेमुळे चर्चेत
  • पाच ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखकांच्या उपस्थितीमुळे पिंपरीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची उंची वाढली
  • द. भि. कुलकर्णी, रा. ग. जाधव, रा. चिं. ढेरे, आनंद यादव यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रावर शोककळा
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारात ‘परिवर्तन’; आता तरुणाईकडे परिषदेचे नेतृत्व
  • साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यातून नागपूरकडे; महामंडळाच्या कामात बदल करण्यात पुण्यात अपयश
  • ‘सरहद’चे पंजाबी संमेलन पुण्यात; यानिमित्ताने पंजाबीसह विविध भाषांतील लेखक आले एका व्यासपीठावर
  • ‘एफटीआयआय’मधील आंदोलनानंतर संस्थेत अनेक बदल; कडक नियमावलीची अंमलबजावणी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi language will be free of red ribbon?