

पिंपरी, ता. २ : दिलेल्या विषयांवर चारोळी लेखन, ऐतिहासिक लेखांवर आधारित गीत लेखन, जुन्या हिंदी-मराठी गाणी व चित्रपटांच्या आठवणी, विशेष दिनानिमित्त लेख लिखाण, धार्मिक ग्रंथांतील ओव्या वा श्लोकांचे विवेचन, साप्ताहिक सदर लेखन असे विविध उपक्रम शहरातील साहित्यिक संस्थांच्या समाज माध्यमे विशेषत: व्हॉट्स ॲप ग्रुपवर राबविले जात आहेत. त्यातून ‘माय मराठी’चा गोडवा राखला जात असून मराठी भाषा संवर्धन व संगोपन केले जात आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे ३३ पेक्षा अधिक साहित्यिक संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून विशिष्ट कालावधीत किंवा दिनविशेष निमित्त वर्षभर वेगवेगळे साहित्यिक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, ‘व्हॉट्स ॲप ग्रूप’च्या माध्यमातून दररोज वेगवेगळे साहित्यिक उपक्रमही काही समूहांतर्फे राबविले जात आहेत. त्या माध्यमातून ‘माय मराठी’चे संवर्धन होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
महापालिकेचाही पुढाकार
महापालिकेनेही मराठी भाषा संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कला- क्रीडा- सांस्कृतिक समितीत ‘साहित्य’ शब्दही समाविष्ट केला आहे. मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त तीन ते नऊ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी सप्ताह’ आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाय, एका उच्च अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नियुक्तीही केली आहे.
असे आहेत उपक्रम
- पिंपरी चिंचवड साहित्य मंचाद्वारे सोमवार ते रविवारी दररोज रात्री नऊ ते दहा या वेळेत चारोळी लेखन स्पर्धा उपक्रम राबविला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित लेख दर बुधवारी समूहावर प्रसारित करून रविवारपर्यंत त्यावर आधारित गीत लेखन स्पर्धा आयोजित केली जात आहे. याच समूहावर श्रावण महिन्यात ‘गाथा सप्तशती’तील गाथांचे निरुपण करणारी मालिका दररोज प्रसारित झाली.
- दिलासा साहित्य समूहावर ‘वेदावतार तुकोबा’, ‘गजानन महाराज चरित्र दर्शन’, ‘आठवणींच्या वाटेवर’, ‘चला जाऊ सिनेमाला’, ‘विद्यार्थी घडवताना’ ही साप्ताहिक सदरे सुरू आहेत. ‘चला ज्येष्ठ साहित्यिकाच्या घरी’ या मासिक उपक्रमाद्वारे साहित्यिक मैफली होत आहेत. याशिवाय समूहातर्फे साहित्यिक सहली उपक्रमातून प्रसिद्ध साहित्यिकांच्या किंवा विशिष्ट ठिकाणाला भेट देऊन साहित्य संवर्धनासाठी उपक्रम राबविले जात आहेत.
- इंद्रायणी साहित्य संमेलन समूहावर दररोज प्रसारित होणाऱ्या ‘मेघदूत- पूर्वमेघ’मधील काव्यांचे विश्लेषण ज्ञानात भर घालणारे ठरत आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या काव्यातील भावार्थ मराठीत सांगून त्यावर केले जाणारे विवेचन आणि त्यातून उलगडणारे भावविश्व मनाला प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलायला लावते. यातून सृष्टीसौंदर्यही मनावर कोरले जाते. शिवाय, विविध साहित्यिक उपक्रमही समूहातर्फे आयोजित केले जातात.
अभिजात भाषा गौरव दिन का?
केंद्र सरकारने तीन ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ (क्लासिकल लॅंग्वेज) दर्जा प्रदान केला. त्या दिवसापासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर हा ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.