
Shantabai Kamble Passed Away : लेखिका शांताबाई कांबळे यांचे पुण्यात निधन
पुणे : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे (वय १०० वर्षे) यांचे येथे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. त्यांच्यामागे मुलगा चंद्रकात आणि मुलगी गौरी तिरमारे आहेत. दलित पँथरचे दिवंगत नेते प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.
शांताबाई गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात मुलीच्या घरी होत्या. झोपेतच त्यांचे निधन झाल्याचे सकाळी ७ च्या सुमारास कुटुंबियांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी १ मार्च रोजी त्यांच्या शंभरीचा कार्यक्रम शहरात झाला होता. त्याला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांताबाई यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे झाला. शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ रोजी नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या. १९८१ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे त्याचे १७ जून १९८६ रोजी प्रकाशित झालेले आत्मवृत्त विशेष गाजले.
'नाजुका' ह्या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्मकथन सादर झाले. फ्रेंच,इंग्रजी,हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले .'फेमिना' मासिकातून त्याचा इंग्रजीत अनुवादित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे , तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला. शांताबाईंच्या पार्थिवावर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे अंत्यसंस्कार झाले.