पुण्याचा मानबिंदू असलेले 'बालगंधर्व' पाडणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

वास्तू पाडू देणार नाही 
""बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना नाट्यकलावंत, नगरसेवक आणि नागरिकांच्या सहभागाने तज्ज्ञ समिती नेमावी. ही वास्तू सुमारे पावणेतीन एकर जागेत असून, याच जागेत बाजूला नवीन वास्तू उभारण्याचा निर्णय घ्यावा. "बालगंधर्व'ची वास्तू पाडू दिली जाणार नाही,'' असा इशारा मानकर यांनी दिला. 

पुणे - ""बालगंधर्व रंगमंदिर हा शहराचा सांस्कृतिक वारसा असून, त्याला पाडण्यास आमचा विरोध राहील. महापालिकेच्या कामाच्या गतीवरून "बालगंधर्व'च्या पुनर्विकासासाठी किमान तीन-चार वर्षे लागतील. या काळात नाट्यरसिक आणि कलाकारांनी जायचे कोठे? "बालगंधर्व' पाडण्याऐवजी त्याच परिसरात नवीन वास्तू उभारावी,'' अशी मागणी माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर यांनी केली. 

अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी सोमवारी खास सभेचे आयोजन केले होते. महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सभेच्या सुरवातीलाच नगरसेवक मानकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्याठिकाणी पुनर्विकास करण्याला त्यांनी कडाडून विरोध केला. 

शहराच्या मध्यवर्ती भागात सांस्कृतिक वारसा असलेल्या "बालगंधर्व'शी पुण्यातील रसिक आणि कलाकारांचे भावनिक नाते आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहालगतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यावरून "बालगंधर्व'च्या पुनर्विकासासाठी बराच वेळ लागेल, असे दिसते. हे वास्तवही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

वास्तू पाडू देणार नाही 
""बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना नाट्यकलावंत, नगरसेवक आणि नागरिकांच्या सहभागाने तज्ज्ञ समिती नेमावी. ही वास्तू सुमारे पावणेतीन एकर जागेत असून, याच जागेत बाजूला नवीन वास्तू उभारण्याचा निर्णय घ्यावा. "बालगंधर्व'ची वास्तू पाडू दिली जाणार नाही,'' असा इशारा मानकर यांनी दिला. 

प्रशासनाकडून पूर्वनियोजन नाही 
याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, प्रशासनाने "बालगंधर्व'च्या केवळ दुरुस्तीचा प्रस्ताव दिल्याचे समोर आले आहे. परंतु, अर्थसंकल्पात पुनर्विकासाच्या नावाखाली दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत प्रशासनाने कोणतेही पूर्वनियोजन केलेले नसल्याचा आरोप दीपक मानकर यांनी केला.

Web Title: marathi news Balgandharva Rangmandir pune