विश्‍वकोश होणार वेगाने अद्ययावत; ऑडिओ- व्हिडिओ 'क्‍लिप'ही तयार

रविवार, 16 जुलै 2017

सरस्वती दीर्घिका समूहाचा शोध नुकताच लागला. अशा ताज्या नोंदी "विश्‍वकोशा'वर वाचायला मिळत नाहीत; पण यापुढे त्या वाचायला मिळतील. नव्या संकेतस्थळामुळे नोंदी घेण्याचे काम जलद होणार आहे. शास्त्रीय संगीताबाबतची माहिती वाचताना हे संगीत नेमके कसे आहे, यात कोणकोणते राग आहेत... अशी इत्थंभूत माहिती शब्दस्वरुपातच नव्हे, तर ऑडिओ- व्हिडिओ स्वरूपातही तुमच्यासमोर येईल. 
- अजिंक्‍य कुलकर्णी, सदस्य, विश्‍वकोश निर्मिती मंडळ

पुणे : मराठीतील ज्ञानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "विश्‍वकोशा'तील नोंदी जुन्या झाल्या आहेत. काही नोंदी कालबाह्य झाल्याने राज्य सरकारच्या मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने "विश्‍वकोश' अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर आधारित संकेतस्थळांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर "विश्‍वकोश' 24 तासांच्या आत अद्ययावत करणे शक्‍य होणार आहे. शिवाय, एखाद्या विषयावरील माहिती वाचताना त्यावर आधारित ऑडिओ- व्हिडिओ "क्‍लिप'ही ऐकायला अन्‌ पाहायला मिळणार आहे. 

"अ' ते "ज्ञ' पर्यंतच्या विश्‍वातील महत्त्वाच्या संज्ञांची सामान्य माणसाला मराठीतून ओळख होण्यासाठी विश्‍वकोश प्रकल्प हाती घेण्यात आला. "विश्‍वकोशा'चे वीस खंड टप्प्याटप्प्याने प्रकाशित केले; पण ते जाडजूड असतात. हाताळायला अवघड आहेत, अशा तक्रारी येऊ लागल्याने "विश्‍वकोश' सीडीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात आला. इतकेच नव्हे, तर अलीकडे पेनड्राइव्ह आणि संकेतस्थळाच्या माध्यमातूनही "विश्‍वकोश' प्रकाशित केला. याचा पुढचा टप्पा म्हणजे विश्‍वकोश अद्ययावत करणे. यावर सध्या मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. 

मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर म्हणाले, ""विश्‍वकोशा'चे वीस खंड संकेतस्थळावर पाहायला मिळतील. ते अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय, साहित्य संस्थांमध्ये 43 ज्ञानमंडळे स्थापली असून त्यात त्या-त्या विषयातील तज्ज्ञ, अभ्यासकांचा समावेश केला आहे. प्रत्येक ज्ञानमंडळाचे संकेतस्थळही सुरू होणार आहे.'' 

विश्‍वकोशात नव्या नोंदीचा समावेश करायचा असेल तर पूर्वी खूप वेळ जायचा. नोंदी लिहिणे, तज्ज्ञांना दाखवणे, त्यात दुरुस्त्या करणे ही किचकट प्रक्रिया आता संकेतस्थळांमुळे दूर होणार आहे. त्यामुळे पडताळणी केलेली माहिती कमीतकमी वेळात वाचकांपर्यंत पोचेल. दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असेही करंबेळकर यांनी सांगितले. 

Web Title: marathi news marathi website pune news Marathi Vishwakosh Sushant Sangve