रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच : प्रभाकर भावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

चेहऱ्याला रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणे, त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्त्वाचे असते. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसते. 
- प्रभाकर भावे, रंगभूषाकार

पुणे : "चांगला रंगभूषाकार होण्यासाठी चित्रकला, शिल्पकलांचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. वाचनाची गोडीही हवी. त्याशिवाय, रंगांच्या माध्यमातून 'कॅरॅक्‍टर' उभे करता येत नाही; पण "कॅरॅक्‍टर'नुसार योग्य रंगभूषा करता आली तर नट खुलतो. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. म्हणून मला रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच वाटतो...,'' अशा शब्दांत रंगभूषेचे महत्त्व सांगत होते रंगभूषाकार प्रभाकर भावे. 

तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील "भावेकाका' अशी ओळख असलेले प्रभाकर भावे सलग 49 वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा करत आहेत. यंदा त्यांच्या रंगभूषेचा सुवर्णमहोत्सव आहे. यानिमित्ताने "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. 

भावे म्हणाले, "सुवर्ण महोत्सवानिमित्ताने मला "पुरुषोत्तम'मधील सुरवातीचे दिवस आठवतात. राजा नातू, माधव वझे यांनी मला स्पर्धेतील विद्यार्थ्यांची रंगभूषा करण्याची पहिली संधी दिली. तेव्हापासून आजपर्यंत मी रंगभूषा करत आलो आहे. आत्तापर्यंत किती मुलांची रंगभूषा केली, हे आकड्यात सांगणे कठीण आहे; पण या स्पर्धेच्या मांडवाखालून गेलेल्या जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याची रंगभूषा करता आली. इतकेच नव्हे, तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकाच घरातील तीन पिढ्यांतील कलाकारांचे चेहरे रंगवता आले, याचे वेगळेच समाधान आहे. या अनुभवामुळेच माझ्यातला रंगभूषाकार खऱ्याअर्थाने घडत गेला आणि तो काळानुसार बदलतही गेला. म्हणून माझ्या आयुष्यात "पुरुषोत्तम'ला महत्त्वाचे स्थान आहे.'' 

मी मूळचा साताऱ्याचा. लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड; पण तेथे व्यासपीठ नसल्याने मी पुण्यात आलो आणि इथेच रमलो. या वाटचालीत नाना जोगळेकर, दादा परांजपे, अण्णा भिडे हे गुरू मिळाले. वडिलांकडून रंगभूषेचे संस्कार मिळाले. "किर्लोस्कर'मध्ये नोकरी करत असतानाच हा छंद जोपासला. सुरवातीला मी स्वतः रंग तयार करायचो. आता काळ बदलला आहे, असे सांगत त्यांनी आपली वाटचालही उलगडली. 

'पुरुषोत्तम' रंगणार आजपासून 
महाविद्यालयीन तरुणाईच्या अभिव्यक्तीचं हक्काचं व्यासपीठ असणारी 'पुरुषोत्तम करंडक' आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा मंगळवारपासून (ता. 8) भरत नाट्यमंदिर येथे सुरू होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत ही फेरी सुरू राहील. स्पर्धेच्या पुणे केंद्राची ही प्राथमिक फेरी असेल. व्हीआयटी, कमिन्स या  पुण्यातील महाविद्यालयांसोबतच अहमदनगरच्या सारडा महाविद्यालयाच्या सादरीकरणाने पहिला दिवस रंगेल. अंतिम फेरी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होईल.

Web Title: marathi news marathi website pune news purushottam karandak Prabhakar Bhave