दोन वर्षांत शहरात १६ हजार परवडणारी घरे

मिलिंद वैद्य
शनिवार, 24 मार्च 2018

प्रकल्पाचे काम सुरू करतानाच सदनिकांची सोडत काढण्याचा विचार आहे. मार्केट रेटपेक्षा घरे स्वस्त असतील. त्यामुळे लोकांचा ओढा वाढेल. कंपन्यांच्या तांत्रिक निविदा २६ मार्चला उघडल्यानंतर कामाचे आदेश दिले जातील. 
- सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

पिंपरी - शहरात आगामी दोन वर्षांत वेगवेगळ्या संस्थांमार्फत सुमारे १६ हजार परवडणारी घरे (ऑफर्डेबल हाउस) उपलब्ध होणार आहेत.

प्राधिकरणाने पाच हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. महापालिका चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत येथे तीन हजार ३०० घरे बांधणार आहे. ‘म्हाडा’ मार्फत वर्ष-दोन वर्षांत अडीच ते तीन हजार घरे पिंपरीगाव व ताथवडे येथे उपलब्ध होतील. तसेच, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून सुमारे पाच हजार घरे उपलब्ध होतील.

प्राधिकरणाकडे पाच कंपन्यांच्या निविदा
नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सेक्‍टर १२ मध्ये प्रस्तावित पाच हजार परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी पाच नामवंत कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्या सोमवारी (ता. २६) उघडण्यात येतील. प्राधिकरणाने प्रकल्प एक व दोनची आखणी केली आहे. हे प्रकल्प आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रकल्पाचे काम एकाच वेळी सुरू होणार आहे. येत्या दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

निविदा दाखल केलेल्या कंपन्या
प्रकल्प एक : मगरपट्टा-नांदेडसिटी, बी. जी. शिर्के, यशानंदा (गुजरात)
प्रकल्प दोन : मगरपट्टा-नांदेडसिटी, बी. जी. शिर्के, शांती कन्स्ट्रक्‍शन्स (गुजरात), पवार-पाटकर (नाशिक)

अद्ययावत सुविधा
इमारतीसाठी सोलर वॉटर सिस्टिम, सुवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, वॉटर रिसायकल यूज प्लॅन्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा विविध योजना राबविण्यात येणार आहेत. पूर्ण प्रकल्पाचे बांधकाम आधुनिक ‘ॲलोफॉर्म टेक्‍नॉलॉजी’नुसार केले जाणार आहे.

प्राधिकरणाचा प्रकल्प
एकूण भूखंड : ४
आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी राखीव : २

पहिला टप्पा
क्षेत्रफळ - ४९,३६३ चौरस मीटर
आर्थिक दुर्बल घटक - १५ इमारती, १७८९ सदनिका
अल्प उत्पन्न गटासाठी - ९ इमारती, ७८३ सदनिका
तळमजल्यावर दुकाने - १०४
अपेक्षित खर्च - २९० कोटी रुपये

दुसरा टप्पा
क्षेत्रफळ : ४४,१३३ चौरस मीटर
आर्थिक दुर्बल घटक : १२ इमारती, १५२९ सदनिका
अल्प उत्पन्न गटासाठी : ९ इमारती व ७८३
तळमजल्यावर दुकाने : ३२
अपेक्षित खर्च : २६५ कोटी रुपये

5000 - प्राधिकरण
3000 - महापालिका
3000 - म्हाडा
5000 - बिल्डर

Web Title: marathi news pimpri news offertable house pradhikaran