लाखमोलाची मदत करणारा असाही 'सांताक्‍लॉज' 

नंदकुमार सुतार 
सोमवार, 25 डिसेंबर 2017

पुणे : नाताळचा सण आला की सर्वांना आठवतो तो सांताक्‍लॉज किंवा सांता ! गरजूंना, मुलांना गुपचूप भेटवस्तू देऊन जाणारा. ना कसला गाजावाजा ना उपकाराच्या भावनेचा लवलेश. निरपेक्ष सेवाच ती. तो भेटवस्तू कुठून आणतो, त्याला काय खर्च येतो हे सहसा कोणी जाणून घेत नाही; मात्र त्यामुळे सारेच आनंदात असतात. बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. संजय उपाध्ये यांनी मदतीचा हात पुढे करण्याचा वसा गेल्या वीसेक वर्षांपासून जपला आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या पैलूचा आढावा घेतला असता, त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे 22 लाखांची मदत केल्याचे समोर आले. 

पुणे : नाताळचा सण आला की सर्वांना आठवतो तो सांताक्‍लॉज किंवा सांता ! गरजूंना, मुलांना गुपचूप भेटवस्तू देऊन जाणारा. ना कसला गाजावाजा ना उपकाराच्या भावनेचा लवलेश. निरपेक्ष सेवाच ती. तो भेटवस्तू कुठून आणतो, त्याला काय खर्च येतो हे सहसा कोणी जाणून घेत नाही; मात्र त्यामुळे सारेच आनंदात असतात. बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. संजय उपाध्ये यांनी मदतीचा हात पुढे करण्याचा वसा गेल्या वीसेक वर्षांपासून जपला आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या पैलूचा आढावा घेतला असता, त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे 22 लाखांची मदत केल्याचे समोर आले. 

डॉ. उपाध्ये हे "गप्पाष्टककार' म्हणून परिचित आहेतच. प्रवचनकार, लेखक, कवी, जादूगार आदी अनेक भूमिकांमध्ये ते वावरत असतात. "मन करा रे प्रसन्न' ही त्यांची मालिकादेखील सर्वांना आवडली. प्रत्येक भूमिकेमध्ये वावरताना आणि ती भूमिका वठवताना या माध्यमातून इतरांना आपण काय मदत करू शकू, हा विचार त्यांनी नेहमीच मनात बाळगला आणि आचरणात आणला. 1995 पासून त्यांनी सुरू केलेले हे काम अनेक संस्था आणि व्यक्तींना साह्यकारी ठरले आहे. 

मुंबई, नगर, पुणे येथील संस्थांना मदत करता-करता ही रक्कम 22 लाखांवर गेली आहे. आपण कंपन्यांच्या "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत केलेल्या मदतीच्या बातम्या नेहमीच वाचतो; परंतु कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळाच "सीएसआर' सांभाळण्याचा हा गुण खूप विरळा मानावा लागेल. स्वत:कडे भरपूर संपत्ती असतानाही अनेक लोक इतरांना मदत करण्यात कंजुषपणा करतात; पण आपल्याकडे काहीही नसताना केवळ अंगभूत कलागुणांच्या जोरावर इतरांना मदत मिळवून देण्याचा गुण कौतुकास्पदच आहे. डॉ. उपाध्ये यांनी आजवर कल्याणी अपंग पुनर्वसन केंद्र, सावली अनाथाश्रम आदी संस्थांना भरीव मदत मिळवून दिली आहे. 

डॉ. उपाध्ये यांचा आजपर्यंतचा प्रवास तसा खूप वळणा-वळणांचा आहे. मुंबईत कॅनरा बॅंकेमध्ये तब्बल दीड तप नोकरी केली; पण त्यानंतर त्यांनी स्वत:ला पूर्णपणे वेगळ्या व्यवसायात झोकून दिले. वेगळ्या छंदात म्हणणे अधिक सयुक्तिक राहील. त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. आर्थिक विषयात रमणारे उपाध्ये काव्य लेखन, हौशी रंगभूमीकडे वळले. एकांकिका सादरीकरण, जादूचे प्रयोग, टीव्ही शो सादरीकरण अशा अनेक छंदांमध्ये ते एकाच वेळी रमले. संत साहित्याचा गाढा अभ्यास करून प्रवचनकार म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली. गप्पाष्टके कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला. त्यांनी आजवर देश-विदेशात सुमारे 1500 कार्यक्रम केले आहेत. प्रत्येक कार्यक्रमावेळी काही वाटा गरजू लोकांसाठी ठेवणे, तसेच अधिकचे निधी संकलन करणे ही वृत्तीदेखील त्यांनी जोपासली आहे. 

इतरांना मदत करावी, असे त्यांच्या मनात का आले, त्याचाही एक किस्सा आहे. त्यांना लहानपणी पोलिओ झाला तेव्हा ओळखीच्या लोकांनी मदतीसाठी हात पुढे केला. त्यामुळे जीवघेण्या आजारातून ते वाचले. चेहऱ्याच्या थोड्या भागावर परिणाम झाला. तेव्हाच त्यांनी निश्‍चय केला, की आपण जेव्हा कमावते होऊ त्या वेळी इतरांना मदत करायची. गेल्या महिन्यात मराठी भाषिक मंडळाच्या निमंत्रणावरून ते टोरांटोला गेले होते. मंडळाचा सुवर्णमहोत्सव होता. त्या वेळी तीन महिलांकडून मिळालेले 400 डॉलर त्यांनी नगरच्या संस्थेला दिले.

व्हॅन्कुवर येथे त्यांचे प्रवचन झाले तेव्हा त्यांना 200 डॉलर मानधन ठरले होते; पण आरतीच्या वेळी 300 डॉलर मिळाले. त्यांनी ही रक्कम न घेता मायदेशात आल्यानंतर अपंग मुलींसाठी तीनचाकी सायकली घेतल्या आणि भेट म्हणून दिल्या आणि त्याचे श्रेय त्यांनी स्वत:कडे न घेता सायकलींवर व्हॅन्कुवरच्या मंडळाचे नाव टाकले. आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही तरी देणे लागतो आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची परतफेड करावी लागते, ही भावना सर्वांनी बाळगली, तर निश्‍चितपणे उद्याचे चित्र चांगले दिसेल. 
 

Web Title: marathi news pune news christmas celebration article