‘फर्स्ट कॉपी’च्या वस्तू झाल्या ‘इन्स्टा हिट’

नीलम कराळे
शुक्रवार, 16 मार्च 2018

दर्जेदार वस्तू मला आवडतात. पण, फार पैसे नसल्यामुळे ‘स्वस्तात मस्त’ अशी फर्स्ट कॉपी मी घेतो. सुरवातीला मला उत्पादनाच्या दर्जाविषयी चिंता होती, पण आतापर्यंत मला चांगला अनुभव आला आहे.
- शुभम सोनावणे

पुणे - ब्रॅंडेड कपडे, वस्तू वापरण्याची हौस कोणाला नसते? पण, ते खिशाला परवडतीलच असे नाही. त्यामुळे ‘ब्रॅंडेड’सारख्याच स्वस्तातील ‘फर्स्ट कॉपी’चे कपडे आणि वस्तूंची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. ‘फर्स्ट कॉपी’च्या वस्तू विकत घेण्यासाठी आता दुकानात जाण्याचीही गरज उरलेली नाही. कारण ही संकल्पना आता ‘इन्स्टा हिट’ झाली आहे. 

‘फर्स्ट कॉपी’च्या व्यवसायवृद्धीसाठी ‘इन्स्टाग्राम’ या फोटो फिल्टर ॲपचा वापर विक्रेते खुबीने करीत आहेत. याला ‘मोबाईल पेमेंट वॉलेट’ तसेच ‘कॅश ऑन डिलिव्हरी’च्या सुविधेचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे आवडलेली वस्तू लगेच घेण्याची ग्राहकांची इच्छा आता सहज पूर्ण होत आहे. 

शहरात कॅम्प, पिंपरी-चिंचवड भागात अशा ‘फर्स्ट कॉपी’ वस्तूच्या विक्रीची दुकाने आहेत. या उत्पादनांबद्दल माहिती देताना एक विक्रेता म्हणाला, ‘‘फर्स्ट कॉपी म्हणजे ब्रॅंडचे नाव असलेली वस्तू. मात्र ती ‘ओरिजनल’ नसते. कोणत्याही छोट्या स्वरूपाचा ‘मॅन्युफॅक्‍चरिंग डिफेक्‍ट’ असलेली ही उत्पादने ‘ब्रॅंडेड’च्या दर्जा नियंत्रण प्रक्रियेतून बाहेर काढलेली असतात. मात्र, त्यामध्ये मोठा दोष नसतो. घड्याळ, बूट, कपडे, पुस्तके, बॅग, गॉगल, हेडफोन, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू अशा विविध गोष्टी मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत.’’

‘‘समजा एखादा ब्रॅंडेड शर्ट २२०० रुपयांना मिळत असेल, तर ‘फर्स्ट कॉपी’ शर्ट ४०० ते ५०० रुपयांना मिळतो. त्याचप्रमाणे ४००० रुपयांच्या ब्रॅंडेड गॉगलची फर्स्ट कॉपी १२०० रुपयांपर्यंत मिळते. फर्स्ट कॉपी घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने १८ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन तरुणांची संख्या जास्त आहे. दुकानासह इन्स्टाग्रामवरूनदेखील ही खरेदी होत आहे,’’ असेही या विक्रेत्याने सांगितले. 

खरेदीची प्रक्रिया
‘इन्स्टाग्राम’वरील विक्रेत्यांच्या अकाउंटवर उत्पादनाची छायाचित्रे असतात, तसेच व्हॉट्‌सॲप क्रमांक असतो. त्यावरूनही आपण उत्पादनाची माहिती मागवू शकतो. आवडलेल्या उत्पादनाबद्दल संबंधित अकाउंटला ‘डायरेक्‍ट मेसेज - डीएम’ केल्यानंतर ‘शिपिंग चार्जेस’ व अन्य माहिती मिळते. ऑनलाइन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडल्यानंतर सुमारे दहा दिवसांत उत्पादन घरपोच मिळते.

1) इन्स्टाग्रामवर अधिक विक्री
2) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अधिक मागणी
3) खिशाला परवडणारे; पण चांगला दर्जा 
4) ऑनलाइन व्यवहार अधिक

 

Web Title: marathi news pune news first copy good insta hit