सरकारच्या कर्जमाफीचा बोजवारा - अजित पवार 

अप्पासाहेब खेडकर
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

देऊळगाव राजे :  राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने राज्य सरकारकडे संपुर्ण कर्जमाफिची मागणी केली होती. परंतु सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतून अनेक जण वंचित राहीले आहेत. जाचक अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत. सरकारच्या कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

देऊळगाव राजे :  राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने राज्य सरकारकडे संपुर्ण कर्जमाफिची मागणी केली होती. परंतु सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतून अनेक जण वंचित राहीले आहेत. जाचक अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या आहेत. सरकारच्या कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

मलठण (ता. दौंड ) येथे आज (ता. 5) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, दौंड पंचायत समितीच्या सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुंशात दरेकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, बॅंकेचे संचालक मदनराव देवकाते, संचालिका वर्षा शिवले, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, आप्पासाहेब पवार, बॅंकेचे अधिकारी विजय टापरे, ताराबाई देवकाते, उज्वला शेळके, सरपंच हनुमंत कोपनर, उपसरपंच नितीन धगाटे, माऊली चव्हाण, भाऊसाहेब देवकाते, आदी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे शेतकऱ्यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी मिळाली होती. सध्याच्या चुकीच्या झालेल्या कर्जमाफीबद्दल आम्ही विधानसभेत आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री मात्र 34 हजार कोटीची कर्जमाफी दिल्याचे सांगत आहेत. वास्तविक भाजपा-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. सरकारच्या काळात शेतीमालाचे भाव पडले आहेत. धनगर समाजाला सरकारने अद्यापही आरक्षण दिलेले नाही. सरकार आरक्षणाविषयी दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागात विद्यानगरी (शैक्षणिक संकुल) उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

भीमा सहकारी साखर कारखान्याविषयी बोलताना पवार म्हणाले, दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची अवस्था बेकार आहे. कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा कमी असून आसवानी व सहविजनिर्मिती प्रकल्प चालू नाहीत. त्यांना जाहीर केलेला भावही देता येत नाही.

यावेळी वीरधवल जगदाळे, रमेश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नवनाथ थोरात यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम आटोळे यांनी केले तर आभारप्रदर्शन नवनीत जाधव यांनी मानले. अजित पवार दौंड शुगर साखर कारखान्याच्या परिसरातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांबरोबर घोंगडी बैठका घेणार आहे. बैठकीत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणार असल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news pune news karjamafi government ajit pawar