गढुळल्या दाही दिशा...

यशपाल सोनकांबळे
मंगळवार, 13 मार्च 2018

दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढतेय प्रमाण
पुणे - शहराच्या हवेतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टीव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे. 

दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढतेय प्रमाण
पुणे - शहराच्या हवेतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टीव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे. 

या संदर्भात ‘चेस्ट रिसर्च फाउंडेशन’चे संचालक डॉ. संदीप साळवे म्हणाले, ‘‘हवेच्या प्रदूषणामुळे श्‍वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. शरीराला आवश्‍यक असलेल्या ऊर्जेपैकी दहा टक्के ऊर्जा अन्न व पाण्यातून मिळते, तर उर्वरित ९० टक्के ऊर्जा श्‍वासाद्वारे मिळणाऱ्या ऑक्‍सिजनमधून मिळते. एक हजार लिटर ऑक्‍सिजन फुफ्फुसे रोज शोषून घेतात. जगातील नागरिकांच्या फुफ्फुसाच्या तुलनेत भारतीय नागरिकांचे फुफ्फुस ३० ते ३५ टक्के दुर्बल असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.’’ 

तसेच बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘हवेतील प्रदूषणामुळे पोटातील गर्भालादेखील श्‍वसनाचा त्रास होतो. नऊ महिने पूर्ण होण्याआधी सातव्या, आठव्या महिन्यात प्रसूती होणे, वजन कमी असणे, मृतावस्थेत मूल जन्मणे असे काही प्रकार होतात. लहान मुलांचा श्‍वसनाचा वेग जास्त असतो. तीन ते पाच वयोगटातील बालके दर मिनिटाला ३० ते ४० वेळा श्‍वास आतबाहेर करतात. त्यामुळे नाकातोंडाद्वारे आत जाणारी हवा प्रदूषित असेल तर दम लागणे, खोकला, नाक चोंदणे, घसा बसणे, डोळ्यांची आग होणे असे आजार होतात. घरातील मच्छर अगरबत्ती, ऊद, चुलीचा धूर, तिखट फोडण्या यांचादेखील परिणाम होतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रदूषणाला सामोरे गेल्यामुळे लहान मुलांना श्‍वसनाचे आजार होतात. गेल्या पाच वर्षांमध्ये लहान मुलांची श्‍वास घेण्याची क्षमता (व्हायटल कपॅसिटी) कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच श्‍वसनाच्या विकारांमध्ये दहा टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे.’’  

एम. डी. फिजिशियन शिशिर जोशी म्हणाले, ‘‘वारंवार होणारे वातावरणातील बदल; तसेच हवेतील प्रदूषणामुळे श्‍वसनाचे विकार वाढले आहेत. प्राथमिक लक्षणांमध्ये सर्दी, खोकला आणि दम लागतो. याला बदललेली जीवनशैली आणि प्रदूषण कारणीभूत आहे. वेळीच उपचार न केल्यास त्यानंतर दुर्धर आजार बळावतात.’’

बाहेर जाताना तोंडाला ‘एन९५’ मास्क लावणे
स्कार्फ किंवा कापडी आवरण तोंडाला बांधावे
धूम्रपान न करणे, धुराच्या सहवासात न जाणे
बांधकामाच्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाय करावेत
हिरव्या पालेभाज्या, फळे खावीत
लहान मुलांना आहारात बीट, गाजर, रंगीत ढोबळी मिरची द्यावी
कृत्रिम रंग घातलेले खाद्यपदार्थ, पेये टाळावीत 
जलतरण तलावात पोहण्यास जावे
घराच्या खिडक्‍यांना पडदे लावावेत
घराच्या परिसरात तुळस, कोरफड, बांबू, कडुनिंब लावावीत

प्रदूषणाची कारणे नोंदवू ...
फोटो, व्हिडिओ ‘सकाळ’ला ‘टॅग’ करा, ट्‌विटर, फेसबुक वर.
टॅग वापरा - #रोखूप्रदूषण
email करा -  webeditor@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pune news sickness pollution cancer