।। तुका आकाशाएवढा ।।

।। तुका आकाशाएवढा ।।

कोणाही जीवाचा  न घडो मत्सर
किसन महाराज साखरे, आळंदी

समानता वा साम्यवाद हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. या शब्दाचा उपयोग करताना बहुतांश वेळा आर्थिक समानता वा सामाजिक समानता एवढ्याच मर्यादित अंशाचा विचार केला जातो. परंतु जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी जो समानतेचा विचार सांगितला आहे, तो या साम्यवादाहून विलक्षण व अलौकिक अशा स्वरूपाचा आहे. श्री तुकाराम महाराजांनी विश्‍वातील सर्व जीवमात्राना जी साम्यता सांगितली आहे, ती विष्णू स्वरूपाची सांगितली आहे.
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ।।

हे संपूर्ण जग विष्णूमय आहे, असे तुकाराम महाराज सांगतात.  
आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल ते हित सत्य करा ।।

अत्यंत लडीवाळपणाने आदरपूर्वक श्री तुकाराम महाराज सांगतात हे साधक भक्त भगवत हो. हे वैष्णव लक्षण समजून व उमजून तुमचे खरे हित साध्य करून घ्या. हे खरे हित साध्य करून घ्यावयाचे असेल तर मानवाने कसे आचरण करावे त्या विषयी श्री तुकाराम महाराज सांगतात ः
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्‍वर पूजनाचे।। 

शास्त्रामध्ये भगवंताच्या अनेक प्रकारच्या पूजांचे विधान आहे. त्यात प्रामुख्याने धर्म पूजा, कर्म पूजा, वर्म पूजा यांचा समावेश आहे. त्यापैकी वर्म पूजा म्हणजे काय त्याचे प्रतिपादन श्री तुकाराम महाराज करतात, कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे हीच त्या विष्णूची वर्म पूजा आहे. या अभंगाच्या शेवटी विश्‍वाचे व परमेश्‍वराचे ऐक्‍य सांगतात ः
तुका म्हणे एका देहाचे अवयव । 
सुख दुःख जीव भोग पावे ।।

या ठायी श्री तुकाराम महाराज जगदीश्‍वरातील अवयव अवयवी भावाचे ऐक्‍य सांगतात. परमेश्‍वर हा अवयवी आहे. सर्व जीव त्या परमेश्‍वराचे अवयव आहेत. जिवाच्या कोणत्याही अवयवास त्रास झाला वा सुख झाले तरी त्याची संवेदना अवयवी रूप जिवास होते. तद्वत आपण जर कोणत्या जिवास सुख-त्रास दिला तर तो त्रास-सुख अंततोगत्वा त्या परमेश्‍वरास प्राप्त होतो. या ठिकाणी सांगितलेली भक्ती व्यक्तिगत भक्ती नसून, सामाजिक व्यवहाराचे शुद्धीकरण करणारी आहे. मानवमात्रातील व्यवहार प्रेमाचा व प्रामाणिकपणाचा करणारी एक सामाजिक चळवळ आहे. जगद्‌गुरू श्री तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे निर्मत्सर होऊन अखिल विश्‍व हे विष्णूस्वरूप आहे असा निश्‍चय करून ती भूमिका अंगी बाणविणे हाच खरा वैष्णवांचा असाधारण धर्म आहे. अशा स्वरूपाची साम्यवस्था जगी अवतरावी, अशी या श्री तुकाराम बिजेच्या निमित्ताने रुक्‍मिणी प्राणसंजीवन श्री विठ्ठलेशाच्या चरणी प्रार्थना करतो.
  
----------------------------------------------------------------------------
धन्य तकोबा समर्थ
रामराव महाराज ढोक, नागपूर

संतांची जवळीक अथवा सानिध्य प्राप्त झाले म्हणजे त्यांचे महत्त्व कळतेच असे नाही. कैकयीला भरत कळाला असता, तर भरतासाठी राज्य व रामासाठी वनवास तिने मागितला नसता. आपला कृष्णच देव आहे, हे यशोदेला कळाले असते, तर खोड्या करू नये म्हणून गणपतीला नवस केला नसता. जिथे आईला मुलगा कळाला नाही तिथे समाजाला संत कसे कळणार. वारकरी संप्रदायात आता ज्ञानोबा-तुकाराम म्हणणाऱ्यांना संध्याकाळी गोडधोड खाऊ घातले जाते. मात्र, त्याच संतांना मांडे भाजायला खापरही मिळाले नाही. संत तुकाराम महाविष्णूचे अवतार आहेत, हे कळाले असते तर मंमाजीबुवांनी काठीने त्यांना मारले नसते. तुकोबाराय म्हणायचे आता माझे महत्त्व तुम्हाला कळणार नाही. पण एक काळ असा येईल की तुम्हाला म्हणावे लागेल. 

ब्रह्मे म्हणविन इहलोकी लोकां।
भाग्य आम्ही तुका देखियेला।।... 


तुकोबारायांवर प्रेम करणारे धन्य म्हणती यात नवल नाही. एकेकाळचे कट्टर विरोधक रामेश्‍वर शास्त्रींना म्हणावे लागले ‘धन्य तुकोबा समर्थ।’ पिता-पुत्राने किंवा मित्राने मित्राचे वर्णन करताना किंवा सासूने जावयाचे वर्णन करताना आधिक्‍य येऊ शकते. मात्र, विरोधक जेव्हा वर्णन करतो, तेव्हा त्यात वसेलीबाजी नसते. ज्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याला समर्थ म्हणावे. भगवंतांत असलेले सामर्थ्य संतांमध्येही असते. भगवंताला घाबरून काळ पळतो. तेच सामर्थ्य तुकाराम महाराजांच्या नामात आहे. 
तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम।।...
भगवतांचे नाम घेतले तर पुण्य होते. 
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणणा कोण करी।।... 
तेच सामर्थ्य संतांच्या नामातही असते. 
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनाचे नावे।।... 
भगवंताला उदार म्हटले आहे. 
उदार तो हरी । ऐसी कीर्ती चराचरी।।...
संतांच्या बाबतीत तेच आहे.
संत उदार उदार। भरले अनंत भंडार।।...
ज्यात सामर्थ्य असते समर्थ त्याला म्हणतात. 
समर्थाचे घरी सकल संपदा।
नाही तुटी सदा कासयाची।।
तसे तुका म्हणे पोते।
सदा भरले नोहे रिते।।...
म्हणून तुकोबाराय समर्थ आहेत.
समर्थसी नाही वर्णावर्ण भेद।...

समर्थ ज्याला म्हणतात जो भेद करीत नाही. तसेच संतांचीसुद्धा आहे. 
या रे या रे लहान थोर। 
याती भलते नाही नर।।...
भगवतांच्या नावाने दगड पाण्यावर तरले. तुकोबारायांनी 
‘जळी दगडासहीत वह्या । 
तारीयेल्या जैशा लाह्या।।...

म्हणून जे सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे, तेच सामर्थ्य जगद्‌गुरू तुकोबारायांमध्ये असल्याने ‘धन्य तुकोबा समर्थ।’

----------------------------------------------------------------------------
विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म।।
ॲड. जयवंत महाराज बोधले, पंढरपूर

संपूर्ण जगाकडे जो सत्यत्व बुद्धीने पाहतो तो संसारिक होय. जो अनित्यत्वबुद्धीने पाहतो तो विरक्त होय. मिथ्यात्वबुद्धीने पाहतो तो ब्रह्मज्ञानी होय. जो पारमात्मबुद्धीने पाहतो तो भगवतभक्त होय. या सर्व भगवतभक्तांमध्ये कळसस्थानी ज्यांना पाहिले जाते ते म्हणजे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज होय. संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचा तीन अवस्थांमध्ये विचार केला जातो. त्यातील एक म्हणजे प्रापंचिक अवस्था, दुसरी साधक अवस्था आणि तिसरी सिद्ध अवस्था होय. या सिद्ध अवस्थेलाच अद्वैत अवस्था म्हणतात. ज्या अवस्थांमध्ये द्वैत राहिलेले नाही. ती अद्वैत अवस्था होय. सर्वत्र परमात्म दर्शन होणे हीच अद्वैत अवस्था होय. संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे.
विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम। अमंगळ।।...

संपूर्ण जग हे विष्णुमय आहे, ही दृष्टी तुकाराम महाराजांना प्राप्त झाली होती. विष्णुमयमधील मय या शब्दाचे तीन अर्थ सांगितले आहेत. एक विकारार्थी, दुसरा प्राचुर्यार्थी आणि तिसरा स्वरूपार्थी. मग इथे विष्णू विकारार्थी म्हणायचे, की विष्णू प्राचुर्यार्थी म्हणायचे, की विष्णुस्वरूपार्थी म्हणावे, असा प्रश्‍न निर्माण होतो. येथे विष्णुस्वरूप जग असा अर्थ घ्यावा लागेल. त्यालाच अद्वैत अवस्था म्हणावी लागेल. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी मी विष्णुस्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, याची जाणीव व्हावी लागेल. मग आपल्याला जग विष्णुमय आहे, याची प्रचिती येईल. यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात,
देह नव्हे मी हे सरे।...
प्रथमतः मी देह ही भावना गेली पाहिजे. त्यामुळे आता
मी वासुदेव तत्त्वतः। 
कळो येईल विचारिता।।...

मी ब्रह्मस्वरूप आहे, ही भावना निर्माण झाल्याने तीच भावना सर्वत्र वाटत आहे. 
जनी वनी अवघा देव। 
वासनेचा पुसावा ठाव।।

संपूर्णतः परमात्मदर्शन होत असल्याने कोणाबद्दलही द्वेष नाही. 
कोणाही जिवाचा। न घडो मत्सर।
वर्म सर्वेश्वर। पूजनाचे।।

अशी व्यापक भूमिका संत तुकाराम महाराजांची होती. ही अद्वैत अवस्था ओळखण्याच्या खुणा तुकाराम महाराजांनीच सांगितल्या आहेत. 
उमटती ठसे। ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे।।
अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता, आनंदरूपता या पाच चिन्हांनी संत तुकाराम महाराजांचे जीवन पूर्णपणे भरलेले दिसून येते आहे. 
त्यामुळेच,  
गाढवाचे घोडे। आम्ही करू दृष्टीपुढे।।
अशी दृष्टी प्राप्त झालेले तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात.
सर्वात्मकपण। 
माझे हिरोनी नेतो कोण।।

अशा या सर्वात्मकपण अवस्थेमध्ये अखंड स्थित असणाऱ्या संत तुकाराम महाराजांची कृपा आम्हा सर्वांवर अखंड राहावी, हीच तुकाराम बिजेच्या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना.   

----------------------------------------------------------------------------
जया शिरी कारभार।
बुद्धी सार तयाची।।

बापूसाहेब मोरे, पंढरपूर
संत तुकाराम महाराजांना लोकशाही मान्य होती. परंतु तकलादू लोकशाही त्यांनी कधीच मान्य केली नाही. तुकाराम महाराजांना सक्षम आणि सुदृढ लोकशाही अपेक्षित होती. जनसामान्यांना खऱ्या अर्थाने फायदा होईल, अशी लोकशाही तुकाराम महाराजांना अभिप्रेत होती. सध्याच्या काळात लोकशाहीची अनेक मूल्ये हरवत चालली आहेत. चुकीच्या पद्धतीचे तिचे मार्गक्रमण सुरू आहे. लोकशाही म्हणजे बहुमतातून होईल तो निर्णय. परंतु अनेक चुकीची माणसे एकत्र येऊन बहुमतातून मान्य होणारा निर्णय योग्य कसा असेल, अशा स्वरूपाची चुकीची लोकशाही महाराजांना मान्य नव्हती. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही।
नाही मानियेले बहुमता।।... 

लोकशाही आता जगाने मान्य केली आहे. सध्याच्या काळात चुकीचे लोक एकत्र येऊन बहुमत सिद्ध करून सत्ता प्राप्त केली जाते. किंवा साम-दाम-दंड वापरून आपले बहुमत सिद्ध करतात. ती खरी लोकशाही होऊ शकत नाही. अशा स्वरूपाचे बहुमत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वीही अमान्य केले. ‘अशा बहुमताला मी मानत नाही,’ असे ते म्हणतात. ज्यांच्याकडे सत्यता आहे, जो बुद्धिवान आहे, अशा लोकांकडे सत्ता असायला हवी. त्यातूनच समाजाचे काही भले होऊ शकते. त्या समाजाची सर्वार्थाने उन्नती शक्‍य आहे. 
जया शिरी कारभार।
बुद्धी सार तयाची।।...

हा संत तुकाराम महाराजांचा अभंग घरातील व्यवस्थापनापासून ते देशाच्या सत्तेपर्यंत लागू पडतो. समजा घरामध्ये चार भाऊ आहेत. आपण अर्थातच थोरल्या भावाला कारभारी करतो. पण त्याला थोरल्या भावापेक्षा तीन नंबरचा भाऊ बुद्धिवान असेल, तर त्याच्याकडे कारभारपण द्यावे, असा विचार तुकाराम महाराजांनी दिला. त्यांना अशा प्रकारची लोकशाही अपेक्षित होती. घराची, देशाची उन्नती ही याच मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे डोळस लोकशाही हीच खरी लोकशाही, असा विचार तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजाला दिला. हीच डोळस लोकशाहीची बिजे समाजात पेरली जावी, हीच तुकाराम बिजेच्या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना. 
----------------------------------------------------------------------------
तुका लोकी निराळा ।
जगन्नाथ महाराज पाटील, मुंबई

जरी महाराष्ट्राचा अजून पंतप्रधान झाला नसेल, तरी ईश्‍वराने महाराष्ट्राला संतप्रधान अगोदरच करून ठेवले आहे. संतसमृद्धी हे मराठी भूमीचे निराळेपण आहे. मुळात या विश्‍वातील सर्वसामान्य माणसांपेक्षा संत निराळेच असतात. 
ज्ञानेश्‍वरी सत्पुरुषाबद्दल म्हणते,
लांबा उगवे आगरी। विभवश्रियेचा।।...

संत आपल्यासारखे दिसतात. पण आपल्यासारखे नसतात. ते निराळेच असतात. पाणी आहे म्हणून कोणी समुद्राला नदी म्हणू नये, पाषाणाचेच असते तरीही कुणी शिवलिंगाला दगड म्हणू नये. तत्त्वतः माणसासारखे दिसले तरी संतांना माणसासारखे समजू नये, त्यांचे निराळेपण ओळखावे.
समुद्र नदी नव्हे पै गा। पाषाण म्हणो नये लिंगा।।
संत नव्हती जगा। माणसा त्या सारिखे।।...

या सर्वांमध्ये जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पूर्ण निराळे आहेत. निराळेपणाची चर्चा दोन अंगानी येऊ शकते. सगळ्यांमध्ये असते ते ज्याच्यात नसते तो निराळा. त्याच्यामध्ये असते ते कोणातच नसते, तो निराळा. सर्वसामान्य आहार, निद्रा, भय, मैथुन या चतुर्व्यूहात अडकले आहेत. 
आहाराच्या बाबतीत तुकाराम महाराज निराळेच. 
आहाराचे प्रमाण ः तहान हरपली भूक। आहाराची रुची। काय खातो आम्ही। कासया सांगाते।।... 
निद्रेचा अनुभव वेगळाच ः 
पळोनिया गेली झोप। होते पाप आडवे।।
भयकातर लोकांमध्ये।।...
निर्भय तुकोबाराय ः 
आम्ही हरिच्या दासा काही। भय नाही त्रैलोकी।।

विषयासक्तांमध्ये वावरणारे विषयविरक्त तुकाराम महाराज ः विषयी विसर पडिला निःशेष।।
काव्य करणारांमध्ये तुकाराम महाराज निराळे आहेत. कवींनी रचलेली काव्ये काळाने बुडविली, पण गाथा बुडून वर येऊन काळावर मात करण्याचे सामर्थ्य देते आहे. सामान्यतः कवी काव्याने देव जागविण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराज काव्यासाठी देवाने जागवले. रामेश्‍वर भट्टांनी निराळेपण मांडले.
मागे कवीश्‍वर झाले थोर थोर। नेले कलेवर कोणे सांगा।।...
सगळ्यांना सोडावा लागणारा देह घेऊन निजधामाला गेलेले तुकोबाराय निराळेच.   
----------------------------------------------------------------------------
साधकाची दशा 
उदास असावी। 
योगिराज महाराज गोसावी, पैठणकर

अज्ञानसिद्ध आणि साधनसिद्ध या प्रकारांपैकी संत तुकाराम महाराजांचे जीवन साधनसिद्ध संत या प्रकारात मोडते. उपजताचि ज्ञानी हे विशेषण संत ज्ञानेश्वर महाराजांना लागू पडते. परंतु संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे जीवन काही विशिष्ट साधनेद्वारे घडलेले आहे. संत तुकाराम महाराजांचे जीवन कार्य पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन प्रकारांत विभागल्याचे दिसून येते. सदेह वैकुंठगमनापूर्वी,
तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।...
या अवस्थेप्रत जाण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले, ते त्यांनी त्यापूर्वी केलेल्या साधनेच्या बळावर. साधन अवस्थेतील तुकाराम महाराज आपल्याला त्यांच्या अभंगातून कळतात. साधकांचे जीवन कसे असावे, याबद्दल तुकाराम महाराज सांगतात,
साधकाची दशा। उदास असावी।
उपाधी नसावी। अंतर्बाह्य।।...

जसे संत बोलतात तसे वागतात आणि जसे वागतात तसेच बोलतात. कथनी आणि करणीमध्ये नसलेला फरकच त्यांना संतपदापर्यंत नेत असतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या साधनेसाठी मुख्यत्वे तीन स्थळे निवडली होती. भंडारा, भामचंद्र आणि घोरवडेश्‍वर डोंगर. त्यांनी डोंगरच का निवडले, तर तेथे एकांतवास मिळतो म्हणून. एकांतवासाचा काय फायदा, तर तुकाराम महाराज सांगतात,
येणे सुखे रुचे। एकांताचा वास। नाही गुणदोष। अंगा येत।।...
डोंगरावर करायचे काय, तर सुरवातीच्या काळात आपल्या पूर्वसुरींच्या अभंग, ओव्यातील अवतरणांचे पाठांतर, भंडारा डोंगरावर श्री एकनाथी भागवताची १०८ पारायणे आदी साधनांनंतर नाम साधनेच्या माध्यमातून अधिकार संपन्नजीवन जगत असतानाच लोकांना आपण केलेली साधने पेलवणार नाहीत, झेपणार नाहीत, हे जाणून संत तुकाराम महाराजांनी परमार्थामध्ये रुची असणाऱ्यांना दोन महत्त्वाची साधने सांगितली. 
साधने तरी हीच दोन्ही। जरी कोष्टी साधील।।
परद्रव्य परनारी। याचा धरी विटाळ।।
देवभग्य घरा येती। संपत्ती त्या सकळां।।
तुका म्हणे ते शरीर। घर भंडार देवाचे।।

तुकोबारायांनी सांगितलेल्या या दोन साधनांचा अवलंब करून आपणही आपले जीवन धन्य करून घ्यावे हीच संत तुकाराम बिजोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना.   
----------------------------------------------------------------------------
भक्तिपंथ बहु सोपा। 
डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, नाशिक

तुकोबारायांच्या समग्र अभंगाचे परिशीलन करताना लोकोद्धार हीच त्यांच्या कार्याची मूळ प्रेरकशक्ती आहे, हेच दिसून येते. आपल्या आत्मशक्तीचा अनुभव आल्यानंतर लोकांना यथार्थ व उपयुक्त उपदेश करण्याची त्यांना अत्यावश्‍यकता वाटली. समाजनिष्ठेने त्यांचे अंतःकरण रसरसलेले होते. निरतिशय आनंदाचा साक्षात्कार होऊनही लोकोद्धारासाठी ते तळमळत होते. कीर्तनामध्ये ते सर्व स्तरांतील समाजाला उपदेश करतात. तुकोबारायांचे समग्र जीवन हे अभंग काव्य हे मुळात भक्ती संप्रदायाचे मूर्त स्वरूप आहे, त्यामुळे भागवत संप्रदायाच्या कळसस्थानी तुकाराम महाराज विराजमान आहेत. 

समाजातील उच्च श्रेणीतील ब्राह्मण, त्याचे प्रतिष्ठित अनुयायी, क्षत्रिय स्वतः यथोचित धर्माचरण न करता अनेक विकारांच्या आहारी जाऊन पदभ्रष्ट झाले. स्वधर्माचे स्वारस्य विसरून परधरर्मीयांचे अनुकरण करू लागले. खऱ्या देवाला विसरून नको त्याची पूजा करू लागले. गुरू-शिष्यांचे स्तोम माजले. देवा-धर्माच्या नावाने अंधश्रद्धेला उधाण आले. सामान्य लोक लुटले जाऊ लागले. गुरू म्हणणाऱ्यांनी शुद्ध परमार्थ बुडविला. अनाचार, व्यभिचाराला प्रतिष्ठा मिळू लागली. निषेधयुक्त आचार प्रभावी ठरू लागले. हे सारे पाहून तुकोबारायांना अतिशय दुःख झाले. पूज्य म्हणून मिरविणाऱ्या समाजकंटकांचे हे दुष्कृत्य पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. संतापही आला. त्यांनी सामाजिक व नैतिकदृष्ट्या अधःपतित समाजाच्या उत्थानासाठी तुकाराम महाराजांनी पराकोटीचे प्रयत्न केले. आपल्या लोकसंवादातून जनसामान्यांच्या या अंधश्रद्धेवर त्यांनी आसूड ओढले. त्यातील भंपकपणा, सत्यासत्यता लोकांसमोर आणली. स्वतः बंधनात असणारे तुम्हाला काय सोडवतील. बुद्धीचा उपयोग करून सत्यासत्येतेचा शोध घ्यावा. आपल्या आत्महिताचा व संसार दुःखनिवृत्तीच्या साधनाचा अवलंब करा. 

जेणे नये जन्म यमाची यातना।  ऐसिया साधना करा काही।।
असा उपदेश ते करतात. इतकेच नाही, तर 
भक्तिपंथ बहु सोपा। 
असे सांगून यासाठी, 
न लागती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायणा।।

असे आश्वासनही देतात. परमात्म्याच्या अनन्य शरणागतिपूर्वक भक्ती उपासनेने त्रिविध ताप, पाप, दैन्य जाते. संतकृपा व परिणामी ईश्वरप्रसाद प्रेमरूपाने प्राप्त होतो. स्वार्थ, दंभ यांच्या पलीकडे जाऊन निखळ प्रेमाचे, भक्तीचे मूल्य रुजविण्याची त्या काळाची गरज तुकोबारायांनी हेरली होती. आपल्या अभंगातून त्यांनी ही नवी मूल्यनिर्मिती करण्याचे कर्तव्य निभावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com