पाचशे वृक्षांची कत्तल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

वडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या मात्र त्याच जागेवर फक्त पंचवीस झाडे शिल्लक आहेत.    

वडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या मात्र त्याच जागेवर फक्त पंचवीस झाडे शिल्लक आहेत.    

कारवाईची मागणी
पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य मनोज पाचपुते व धनंजय जाधव यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव दयानंद घाडगे यांच्याकडे केली आहे. नगर रोड भागातील कल्याणी नगर येथील नदीपात्रालगत हरित पट्ट्याचे आरक्षण होते. परंतु विकास आराखड्यात ते बदलून त्यातील काही जागा निवासी करण्यात आली. हा संपूर्ण हरितपट्टा नदीपात्रालगत असल्याने येथे भरपूर  झाडे आहेत. परंतु ज्या भूखंडावरील आरक्षण बदलण्यात आले त्या जागेवरील सुमारे पाचशे वृक्षांची बेकायदेशीर कत्तल झाली आहे.

अहवालात नोंद
वृक्षतोड झाल्याचे समोर आल्यानंतर घाडगे यांनी वृक्षगणनेचे काम दिलेल्या सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीकडून संबंधित जागेवर केलेल्या वृक्षगणनेची माहिती मागवली होती. त्यानुसार या जागेवर नऊ महिन्यांपूर्वी वृक्षगणना केल्याचे नमूद करून संबंधित जागेवर एकूण पाचशे ब्याण्णव झाडे होती, असे कंपनीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याविषयी पाचपुते व जाधव म्हणाले, की नदीपात्रालगतची जागा निवासी केल्याने पर्यावरणाचे नुकसान झाले. त्याही पुढे जाऊन वृक्षातोडीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या भागातील वृक्षगणना यापूर्वीच झाली असल्याने बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार समोर आला.

अद्याप माझ्याकडे अशी वृक्षतोड झाल्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. संबंधित विभागाच्या उद्यान पर्यवेक्षकाला जागेवर पाठवून माहिती घेतली जाईल. 
- वसंत पाटील, वृक्ष अधिकारी, नगर रस्ता

माझ्याकडे प्रशासकीय जबाबदारी आहे. जागेवर वृक्षतोड झाली का, याची माहिती तेथील वृक्षअधिकारी वसंत पाटीलच देऊ शकतील.  
-  दयानंद घाडगे, सचिव, वृक्ष प्राधिकरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vadgaon sheri news 500 tree cutting