'शंभर रुपये पाणीबिलाचा निर्णय चुकीचा'

ज्ञानेश्‍वर बिजले
शनिवार, 3 मार्च 2018

पिंपरी - ""मीटरनुसार पाणीपट्टी भरणाऱ्या कुटुंबांना दरमहा किमान शंभर रुपये बिल आकारण्याचा निर्णय चुकीचा असून, तो रद्द करावा,'' असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना शुक्रवारी स्पष्ट केले. किमान बिलआकारणीमुळे कमी पाणी वापरणाऱ्या नागरिकांना दिलेली सवलत मिळणार नाही, त्यांना विनाकारण जादा रक्कम भरावी लागेल, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी महापौर नितीन काळजे यांना कळविले आहे. 

पिंपरी - ""मीटरनुसार पाणीपट्टी भरणाऱ्या कुटुंबांना दरमहा किमान शंभर रुपये बिल आकारण्याचा निर्णय चुकीचा असून, तो रद्द करावा,'' असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना शुक्रवारी स्पष्ट केले. किमान बिलआकारणीमुळे कमी पाणी वापरणाऱ्या नागरिकांना दिलेली सवलत मिळणार नाही, त्यांना विनाकारण जादा रक्कम भरावी लागेल, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी महापौर नितीन काळजे यांना कळविले आहे. 

शहरातील पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी घेण्यात आला. पाणीपट्टी चौपट ते पाचपट वाढविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला होता. तो दर अन्य शहरांच्या तुलनेत जवळपास असेल एवढा कमी करावा; तसेच जादा पाणी वापरणाऱ्यांच्या पाणीपट्टी दरात वाढ करावी, असे पत्र जगताप यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी महापौर नितीन काळजे यांना दिले होते. त्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने रविवारी (ता. 25) प्रसिद्ध केले. जगताप यांनी सुचविलेल्या दरात भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी काही बदल केले. त्याबाबत जगताप यांनी काही प्रमुख नगरसेवकांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. 

जगताप म्हणाले, ""नागरिकांची पाणीपट्टी वाढविण्याची आमची इच्छा नाही. मात्र, या शहराची गरज जेमतेम भागेल इतकेच पाणी सध्या धरणातून मिळते. वितरणव्यवस्था नीट नसल्यामुळे सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळत नाही. अशावेळी सर्वांनीच पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. गरजेएवढे पाणी वापरा. पाण्याच्या अपव्यय टाळा. याकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष दिले, तर सर्वांनाच पुरेसे पाणी मिळेल. गरजेपेक्षा जादा पाणी वापरणाऱ्यांकडून जादा रक्कम वसूल करावी.'' 

""एका कुटुंबाने दरमहा सहा हजार लिटरपर्यंत पाणी वापरल्यास, त्यांना ते मोफत दिले जाईल. साडेबावीस हजार लिटरपर्यंत वापरल्यास त्यांना 66 रुपये पाणीपट्टी भरावी लागेल. या पाणीपट्टीत फारशी वाढ होत नाही. मात्र, प्रतिकुटुंबाला किमान बिल शंभर रुपये आकारल्यास, ज्या नागरिकांनी पाणी वाचविले, त्यांनाच जादा रक्कम भरावी लागेल. त्यामुळे किमान पाणीपट्टी बिल आकारण्याचा निर्णय चुकीचा आहे. सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयाचा वृत्तांत पुढील बैठकीत कायम करताना ही दुरुस्ती करावी. प्रतिकुटुंब तीस हजार लिटरपेक्षा जादा पाणी वापरणाऱ्यांकडून जादा पाणी वापरासाठी प्रतिहजार लिटरसाठी बारा रुपयांऐवजी वीस रुपये घ्यावेत.'' 

फारशी झळ बसणार नाही 
पाच माणसांचे कुटुंब गृहीत धरून प्रतिव्यक्ती 40 लिटर पाणी पुरविल्यास दरमहा सहा हजार लिटर पाणी होते. त्यांना सध्या दरमहा 15 रुपये पाणीपट्टी आहे. त्या नागरिकांना मोफत पाणी मिळेल. प्रतिव्यक्ती 135 लिटर पाणी द्यावे, त्यापेक्षा जास्त देऊ नये, असा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घेतला आहे. सध्या प्रतिव्यक्ती 150 लिटर पाणी घेणाऱ्या कुटुंबाला दरमहा 22 हजार पाचशे लिटर पाणी मिळते. त्यांना 56 रुपये 25 पैसे बिल सध्या असून, पाणीपट्टीवाढीनुसार ते 66 रुपये होते. त्यामुळे गरजेपुरते पाणी वापरणाऱ्या कुटुंबांना पाणीपट्टीवाढीची फारशी झळ बसणार नाही. मात्र, या कुटुंबांना किमान बिल दरमहा शंभर रुपये आकारल्यास, त्यांची पाणीपट्टी दुपटीने वाढेल. ते जेवढे पाणी वापरतात, त्या प्रमाणातच रक्कम त्यांच्याकडून घेतली पाहिजे. सध्या पाणी कमी मिळत असल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

Web Title: marathi news water bill pimpri pcmc mla laxman jagtap