
पुणे : सौरवादळांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या उपकरणाची निर्मिती एका मराठी शास्त्रज्ञाच्या नेतृत्वात झाली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर पुणे) कार्यरत असलेल्या प्रा. भास बापट यांनी आदित्य ‘सोलर विंड पार्टिकल एक्स्पिरीमेंट’ची (एएसपीएएक्स) निर्मिती केली आहे.
अहमदाबाद येथील फिजिक्स रिसर्च लॅबरोटरीमध्ये (पीआरएल) असताना त्यांनी ही कल्पना मांडली होती. आदित्य- एल १च्या यशस्वी उड्डाणानंतर ‘सकाळ’ शी संवाद साधताना प्रा. बापट म्हणाले, ‘‘इस्रोच्या प्रक्षेपकाद्वारे आदित्य-एल १चे यशस्वी उड्डाण झाल्याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, आमचे लक्ष लागले आहे ते तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष येणाऱ्या संदेशाकडे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आदित्य- एल १ पोचल्यानंतर ते कार्यान्वित झाल्यावर खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा करू.’’
२०१३ मध्ये सोलर विंड पार्टिकल एक्स्पिरीमेंटची संकल्पना मांडण्यात आली. २०२० मध्ये प्रत्यक्ष अवकाशात पाठविण्यासाठीचे उपकरण विकसित झाले. एकाच यानाद्वारे वेगवेगळ्या दिशांनी येणारे सौरकण आणि प्रारणांची माहिती याद्वारे मिळणार आहे.
सोलर विंड पार्टिकल एक्स्पिरिमेंट
प्रोटॉन आणि अल्फा कणांनी भारित असलेल्या सौरवादळांचा अभ्यास करणारे उपकरण
१०० इलेक्ट्रॉन व्होल्ट ते ५ मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या तीव्रतेच्या कोरोनोल मास इजेक्शन (सीएमई) चा अभ्यास करणार
सौर वादळांबरोबरच सुपर थर्मल आणि प्रभारीत कणांचा स्पेक्ट्रोमीटरचे तंत्रज्ञानही यात आहे
अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरच्या साहाय्याने उपकरणाची निर्मिती
‘पीएसएलव्ही’ची वैशिष्ट्ये
आदित्ययानाला अवकाशात नेण्यात ‘पीएसएलव्ही’ या प्रक्षेपकाचा मोठा आहे. द्रवरुप इंधनाचा वापर असलेल्या या प्रक्षेपकावर ‘इस्रो’चा १९८७ पासून भरवसा आहे. अवकाशात यानाला वेग देण्यासाठी ‘लॅम’ (लिक्विड अपोजी मोटार) या थ्रस्टरचा वापर केला आहे, अशी माहिती प्रक्षेपक विभागातील वरीष्ठ अधिकारी डॉ. ए. के. अस्राफ यांनी सांगितले. आदित्ययानाला लॅगरेंज पॉइंटपर्यंत पोहोचविण्यात ‘लॅम’ची मुख्य भूमिका असेल.
आदित्य-वनला रोहतकचे नटबोल्ट
आदित्य मोहिमेच्या माध्यमातून हरियानाच्या रोहतकचे नाव इतिहासात लिहले जाणार आहे. चांद्रयान-३ मध्ये रोहतकच्या कंपनीत तयार झालेले सुटे भाग(नट बोल्ट) चंद्रावर पोचले आहेत. आता आदित्य वनमध्ये देखील रोहतकमध्येच तयार केलेल्या सुट्या भागाचा वापर केला आहे. रोहतकच्या एरो फास्टनर्सने आदित्यसाठी दोन कोटींपेक्षा अधिक सुटे भाग (नट बोल्ट) इस्रोला पुरविले आहेत.
ईप्सित जागी जाण्याचा काळ : चार महिने
आदित्य- एल १ यानाने इस्रोच्या पीएसएलव्ही एक्सएल प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात उड्डाण घेतले. प्रारंभी हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापन करण्यात येईल. यानाची कक्षा वाढविणे आणि ते लॅगरेंज बिंदूच्या दिशेने प्रक्षेपित करणे यासाठी यानातील प्रॅपल्शनचा वापर करण्यात येणार आहे.
जशीजशी यानाची कक्षा वाढविण्यात येईल तसेतसे हे यान पृथ्वीच्या गुरुत्त्वीय क्षेत्रापासून दूर जाणार आहे आणि अखेर पृथ्वीचे गुरुत्त्वीय क्षेत्र ओलांडल्यानंतर हे अवकाशयान एल-१ बिंदूच्या कक्षेत स्थापित करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
‘आदित्य-एल१’ कडून मिळणारा विदा (डेटा) प्रारंभीच्या काळात भारतीय संशोधन संस्थांना उपलब्ध होईल. पण, त्यानंतर तो जगभरातील संशोधकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
- प्रा. डॉ. भास बापट, आयसर, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.