मूकनायकांचा संवेदनशील हुंकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

पुणे - मूकनायकांच्या संवेदनांचा हुंकार ठळकपणे साहित्य क्षेत्रात उमटवणारे मराठीतील पहिले समलिंगी- उभयलिंगी - तृतीयपंथी- द्विलिंगी साहित्य संमेलन रविवारी ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडले. शतकानुशतके लैंगिक अल्पसंख्याकांच्या साहित्याला, त्यांच्या जाणिवांना - प्रश्‍नांना प्रस्थापित साहित्यात, साहित्यव्यवहारात सन्मानाची जागा मिळाली नाही, तृतीयपंथीयांच्या भाषेला आजही हिणवले जाते; मात्र याच धगधगत्या भाषेतला जगण्यासाठीचा विद्रोह ठळकपणे साहित्य म्हणून समोर ठेवण्याचे काम या संमेलनाने केले.

लैंगिक अल्पसंख्यांकाच्या हक्कांसाठी अनेक वर्षांपासून विविध पातळ्यांवर संघर्ष करणारे कार्यकर्ते बिंदुमाधव खिरे यांनी या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. लैंगिक अल्पसंख्याकांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचे अभिवाचन, नाट्य सादरीकरण, पहिल्या समलिंगी विवाहावर केलेल्या लेखनाचे अभिवाचन, ई - साहित्य, कवितांवर चर्चा, काव्य सादरीकरण, तृतीयपंथीय साहित्यिकांचे अनुभव कथन, असे भरगच्च कार्यक्रम असलेल्या या साहित्य संमेलनाला तरुणाईने उत्तम प्रतिसाद दिला. 

सुरेश खोले व पुष्कर एकबोटे यांच्या ‘विकीपीडिया’ या विषयावरील चर्चेने लैंगिक अल्पसंख्याकांबाबत विकीपीडियावर मराठीत विश्‍वासार्ह माहिती उपलब्ध नाही, हे अधोरेखित झाले. ही माहिती उपलब्ध असणं का आवश्‍यक आहे, यावरही चर्चा करण्यात आली. तसेच,  स्त्री, बायकी पुरुष, तृतीयपंथीयांवर होणारी हिंसा व लैंगिक हिंसा यावर स्त्रीवादी अभ्यासक मनीषा गुप्ते यांनी आपले विचार मांडले. दरम्यान, बिंदुमाधव खिरेलिखित ‘पार्टनर’ या पुस्तकाचे लोकार्पणही या वेळी करण्यात आले. 

‘ऑफबीट’ ठरले आकर्षण
जमीर बदरुन्निसा यांचे ऑफबीट हे नाटक, तर हृषीकेश साठवणे यांनी लिहिलेल्या ‘यवतमाळचा पहिला समलिंगी विवाह’ या कलाकृतीचे सौरभ बोन्द्रे यांनी केलेले वाचन हे या संमेलनाचे आकर्षण ठरले. दिशा शेख, सारंग पुणेकर या तृतीयपंथी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या व तृतीयपंथीय म्हणून जगतानाचे अनुभव कथन केले.

Web Title: Marathi Wikipedia Suresh Khole Pushkar Ekbote