
पुणे - कोरोनापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने आता पुण्याच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. शहरातील बहुतेक प्रमुख बाजारपेठा आता सुरू झाल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग येऊ लागला आहे. लक्ष्मी रोड, रविवार पेठ, कर्वेरोड, नाना पेठ, महात्मा फुले गंज पेठ आदी बाजारपेठा पूर्वपदावर येत आहेत.
लॉकडाउनमुळे पुण्यातील सर्व व्यवहार गेली तीन महिने ठप्प झाले होते. मात्र 1 जूनपासून राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केल्याने शहरातील बाजारपेठा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील कापड, सोने-चांदी यांची दुकाने सम आणि विषम तारखांना सुरू झाली. आता रविवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ या भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने तेथील बाजारपेठाही खुल्या झाल्या आहेत. नाना पेठेतील वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची विक्री करणारी दुकानेही गुरुवारपासून सुरू झाली आहेत. शहरातील सुमारे 70 टक्के बाजारपेठा आता सुरू झाल्या असून, व्यापारी, दुकानदार यांच्याकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर आदी गोष्टींची आवर्जून काळजी घेत असल्याने आता ग्राहकांचीही संख्या वाढत असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या काळात लांबणीवर पडलेली लग्न आता सुरू झाली आहेत. त्यामुळे कापड बाजारातील खरेदीही वाढली आहे. रविवार पेठेतील, लक्ष्मी रस्त्यावरील, डेक्कन भागातील कापड दुकानांमध्ये साड्या, तसेच इतर कपडे खरेदीसाठी गर्दी वाढू लागल्याचे रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शाळा अद्यापही ऑनलाइन सुरू असल्या तरी वह्या, पुस्तके, स्टेशनरी खरेदीसाठी होलसेल तसेच रिटेल बाजारातही गर्दी वाढू लागली आहे. अप्पा बळवंत चौक तसेच उपनगरांमध्येही स्टेशनरीची दुकाने सुरू असून त्या ठिकाणची खरेदीही वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन बाजारही सुरू झाला असून, घरांमधील दुरुस्तीची कामे सुरू झाल्याने पंखे, ट्यूब, यासह सुट्या भागांची मागणी वाढली असल्याचे इलेक्ट्रिक बाजारातील विक्रेते रवींद्र शहा यांनी सांगितले.
वाहनविक्रीही जोमात सुरू
तीन महिन्यांपासून वाहन विक्रीची दुकानेही बंद होती. आता बहुतेक कंपन्यांची पुण्यातील शो रूम सुरू झाली असून, लॉकडाउनपूर्वी बुकिंग केलेली वाहने सध्या ग्राहक नेत आहेत. तसेच नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही खरेदी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
""आर्थिक चक्र पूर्ववत होण्यासाठी नागरिकांनी न घाबरता खरेदीसाठी बाहेर पडावे. आम्ही आवश्यक ती काळजी घेत आहोत. पुण्यातील बहुतेक बाजारपेठा आता सुरू झाल्या आहेत, लवकरच खरेदीला वेग येईल. परिस्थिती वेगाने पूर्ववत होत आहे.''
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ
""पुण्यात आता बाजारात उलाढाल सुरू झाली आहे. आयर्न-स्टील वगळता होलसेल मार्केट सुरू झाले आहेत. सर्वच प्रकारच्या मालाची खरेदी सुरू होत असून, या महिनाअखेर सर्वच बाजारपेठा पूर्ववत होतील, अशी आशा आहे.''
- महेंद्र पितळिया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ
""लग्नासाठी अंगठी बुक केली होती. इतरही दागिने घ्यायचे होते. त्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर आले होते. साड्यांचीही खरेदी केली. मला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू मिळाल्या.''
- जयश्री जाधव, ग्राहक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.